मनिष रक्षमवार, प्रतिनिधी
Morena Train Accident : मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी झालेल्या एका भीषण रेल्वे अपघाताने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. उदयपूर इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरल्यानंतर घाबरलेले प्रवासी ट्रेनमधून उतरले आणि रेल्वे रुळांवर धावले. विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या पातालकोट एक्स्प्रेसने धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि अनेकजण ट्रेनमधून उतरले
मिळालेल्या माहितीनुसार,हा अपघात हेतमपूर रेल्वे स्टेशनजवळ झाला.कोणीतरी अचानक ट्रेनला आग लागल्याची बातमी पसरवली.अफवा ऐकताच प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि अनेकजण ट्रेनमधून उतरले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रुळावरून बाजूला झालेल्या प्रवाशांना याची कल्पना नव्हती की,पातालकोट एक्स्प्रेस शेजारच्याच रुळावरून भरधाव वेगाने जात होती. काही क्षणातच अनेक लोकांना ट्रेनची धडक बसली.या अपघातात एकाच कुटुंबातील चार प्रवासी अडकल्याचीही माहिती आहे.
नक्की वाचा >> Big News: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यातील बळीराजा सुखावणार, सरकारकडून 836 शेतकऱ्यांना मिळणार 50 लाखांची मदत
कोणीतरी अचानक साखळी ओढली आणि..
एका महिला प्रवाशाने म्हटलंय की,कोणीतरी अचानक साखळी ओढली आणि "आग लागली आहे"असं ओरडलं.घाबरलेले प्रवासी ट्रेनमधून उतरू लागले.त्याचवेळीविरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रेनने अनेक लोकांना धडक दिली.या घटनेनंतर रेल्वे प्रशासन,पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.आगीची अफवा कशी पसरली आणि हा कट होता की केवळ गैरसमज होता.याबाबत रेल्वेकडून तपास सुरु आहे. प्रशासनाने प्रवाशांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.