साजन धाबे, प्रतिनिधी
Washim News : एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.वाशिम जिल्ह्यातील 836 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 49 लाख 99 हजार 671 रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला आहे.1 ते 4 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्ह्यात अवकाळी पाऊस,गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
जिल्ह्यातील 57 गावांमध्ये पिके झाली होती बाधित
या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील 57 गावांमधील 291.61 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली होती.नुकसानग्रस्त भागांमध्ये महसूल व कृषी विभागाच्या पथकांनी संयुक्त पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर केला होता.या अहवालाच्या आधारे राज्य शासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF)च्या निकषांनुसार मदत मंजूर केली आहे.मंजूर करण्यात आलेली मदत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
नक्की वाचा >> राज्यातील धरणांमध्ये एकूण किती जलसाठा? पुण्याला मोठा फटका, ग्रामीण भागाचीही अवस्था वाईट, वाचा लेटेस्ट अपडेट
आर्थिक मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा
खरीप हंगामाच्या तोंडावर मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.बी-बियाणे,खते आणि इतर शेतीच्या आवश्यक खर्चासाठी ही मदत उपयुक्त ठरणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्हा प्रशासनाने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून लवकरच सर्व लाभार्थ्यांना मदतीचा लाभ मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून आगामी हंगामासाठी नव्या उमेदीने तयारी करण्याचा आत्मविश्वासही या मदतीमुळे वाढला आहे.
नक्की वाचा >> Shirdi News: शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला जाताय? मंदिरातील 'हा' व्हिडीओ एकदा बघाच
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world