माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जाहीर केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. या योजनेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र ऑनलाईन अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहे. अर्ज पुर्ण भरल्यानंतरही तो सबमिट होत नाही. तर काही महिलांना ऑनलाईन अर्ज असल्याने तो भरण्यात अडचणी येत आहे. काहींना तर याची कल्पनाही नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी महिलांकडून पैसे घेवून अर्जभरून देण्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई महापालिकेच्या एम ईस्ट वार्ड अधिकाऱ्याला एक माहिती मिळाली. त्यानुसार एक व्यक्ती लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी 100 रूपये प्रत्येक महिलेकडून घेत आहे. ही माहिती मिळतात महापालिका प्रशासनाने पोलिस स्थानकात धाव घेतली. योजनेसाठी महिलांकडून पैसे वसूल केले जात आहेत अशी तक्रार आपल्याकडे आल्याचे महापालिकेने पोलिसांना सांगितले. त्यानंतर देवनार पोलिसांनी याबाबत एका अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. ही व्यक्ती नकी कोण होती? याबाबत माहिती मिळू शकलेले नाही.
ट्रेंडिंग बातमी - पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला, 5 जणांचा मृत्यू 42 जण जखमी
या योजनेसाठी कोणतेही शुल्क आकारले गेले नाही. ही प्रक्रीया संपुर्ण मोफत आहे. असे असताना जर कोणी अर्ज भरण्यासाठी पैसे मागत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. काही दिवसा पूर्वी एका तलाठ्यानेही असाच प्रताप केला होता. त्यावर सरकारने तातडीने कारवाई केली होती. 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करायचे आहेत. ज्या महिलांचे वय 25 ते 65 वर्षापर्यंत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखा आहे अशानाच याचा फायदा मिळेल. पात्र महिलांना सरकार दरमहा 1500 रूपये देणार आहे.