देवा राखुंडे
जगदगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यातील वरवंडकरांचा पाहुणचार घेतला. त्यानंतर बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडीकडे मुक्कामासाठी प्रस्थान केले. दिंडी सोहळ्याने पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास संपवला आहे. त्यानंतर नागमोडी वळणाच्या रोटी घाट टाळ मृदुंगाच्या साथीने हरिनामाच्या जयघोषात सहज पार केला आहे. हा घाट पार करण्यासाठी रोटी गावच्या सहा बैल जोड्यांनी परंपरेप्रमाणे पालखी रथाला साथ दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहूतून प्रस्थान झाले. त्यानंतर पंढरीपर्यंत जाण्यासाठी जवळपास 230 किलोमीटरचा अंतर कापत ही दिंडी पंढरपूरला पोहचणार आहे. या प्रवासातील सर्वात खडतर मार्ग म्हणजे रोटी घाट आहे. हाच रोटी घाट लाखो वारकऱ्यांनी हरिनामाच्या जयघोषात पांडुरंगाच्या भक्तीत टाळ मृदंगाच्या गजरात अगदी सहज पार केला आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील हा सर्वात कठीण टप्पा समजला जातो. मात्र वारकऱ्यांनी तो सहज पार केला आहे.
तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा महर्षी वाल्मीक ऋषींच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेल्या वाल्हे नगरीत विसावला आहे. सकाळी जेजुरी नगरीतील भाविकांचा निरोप घेत, हा पालखी सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात, आणि 'विठ्ठल-विठ्ठल' च्या जयघोषात दुपारी साडेबारा वाजता पालखी वाल्हे गावात दाखल झाली. यानंतर येथे समाज आरती पार पडली.
वारी सोहळ्याच्या प्रवासात दुपारच्या वेळी होणारी ही एकमेव आरती असल्याने, या महाआरतीला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. माऊलींचा आजचा मुक्काम वाल्हे येथेच होणार आहे. उद्या म्हणजेच गुरूवारी सकाळी माऊलींच्या पवित्र पादुकांना नीरा नदीत विधीपूर्वक स्नान घालण्यात येणार आहे. हा एक महत्वाचा क्षण असतो. याचे साक्षिदार लाखो भाविक उद्या होतील. पादुकांना नीरा नदीत स्नान घातल्यानंतर पालखी सोहळा पुढे जाईल.