सुरज कसबे, प्रतिनिधी
पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना निगडीमध्ये जोरदार घोषणाबाजीला सामोरं जावं लागलं. राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती आणि सचिव यांच्या परिषदेमध्ये त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. 'अब्दुल सत्तारचे करायचे काय. खाली डोक वर पाय', 'पन्नास खोके एकदम ओक्के' अशा घोषणा यावेळी सत्तारांच्या विरोधात देण्यात आल्या.
निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती . या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले.राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी आणि इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयी-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व उपाययोजना इत्यादी विषयाचे अनुषंगाने संवाद साधण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
( नक्की वाचा : अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात काय चाललंय? भाजपाची मंत्र्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडं धाव )
कृषीपणन मंत्री अब्दुल सत्तार नियोजीत कार्यक्रमाला दीड तास उशिरा पोहचले. तेथे आल्यानंतर केवळ एकच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. प्रतिनिधी बोलत असताना त्यांनी तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. वाद निर्माण होईल असे वक्तव्य करु नका. मला राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीला जायचे असे म्हणून त्यांनी परिषदेतून काढता पाय घेतला.