पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज, 1 जून रोजी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारी अपघाताची घटना घडली आहे. खालापूर फूड मॉलजवळ पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन अवजड वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
कारची अपघातग्रस्त वाहनाला धडक
दोन अवजड वाहनांच्या अपघातानंतर याच दरम्यान मागून येणाऱ्या एका भरधाव इर्टीगा कारने अपघातग्रस्त वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या कार धडकेत कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच हायवे पोलिसांनी आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
(नक्की वाचा- GT Team Bus Catches Fire: गुजरात टायटन्सच्या बसला भीषण आग! फायनल सामन्यानंतर परतताना मोठा अनर्थ टळला)
मिसिंग लिंक तासभर बंद
या भीषण अपघातामुळे आणि रस्त्यावरील वाहनांच्या ढिगाऱ्यामुळे मुंबईकडे जाणारा 'मिसिंग लिंक' हा नवीन मार्ग सुमारे तासभर पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. मिसिंग लिंक बंद झाल्यामुळे हायवे पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक लोणावळ्यापासून मुख्य द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने वळवली होती.
अचानक मार्ग बदलण्यात आल्यामुळे आणि वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे महामार्गावर सुमारे दोन तास वाहतूक कमालीची विस्कळीत झाली होती, ज्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागला.
(नक्की वाचा- Cylinder Price Hike: महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ; 5 किलोचा 'छोटू' सिलिंडरही महागला)
परिस्थिती आता नियंत्रणात
हायवे पोलिसांनी घटनास्थळी क्रेन पाचारण करून युद्धपातळीवर काम करत दोन्ही अपघातग्रस्त अवजड वाहने आणि कार रस्त्यावरून बाजूला काढली. रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी झाल्यानंतर प्रशासनाने मिसिंग लिंक पुन्हा एकदा वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केला आहे. सुदैवाने, या अपघाताचा मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही, तिकडची वाहतूक सुरळीत सुरू होती. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.