अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशनने उत्थान या आपल्या सीएसआर प्रकल्पाचा एक भाग म्हणून तिसरा वार्षिक उत्थान उत्सव मुंबईत साजरा केला. या उपक्रमामुळे महापालिका शाळांमधील पंचवीस हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षण कौशल्यात चांगला बदल झाला आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता वाढवून शिक्षणाचे चांगले फलित मिळावे हा उत्थान चा उद्देश आहे. या प्रकल्पात सरकारी प्राथमिक शाळा दत्तक घेऊन प्रिय विद्यार्थी या मोहिमेद्वारे शाळेतील गळती थांबवणे आणि कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवणे यासाठी सहकार्य केले जाईल. यात विद्यार्थ्यांचे गणिती कौशल्य आणि मूलभूत शिक्षण कौशल्य वाढवण्यासाठी शिक्षक आणि पालक यांना एकत्र आणले जाईल. उत्थान उपक्रमाअंतर्गत अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशन यांनी महापालिकेच्या मालाड, दहिसर, बोरीवली, चेंबूर, कुर्ला येथील 43 शाळांमधील पंचवीस हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात चांगला फरक पडला आहे.
याप्रसंगी उत्थान उपक्रमाची माहिती देणारे कॉफीटेबलबुक प्रसिद्ध करण्यात आले. महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अमित सैनी, उपायुक्त ( शिक्षण ) डॉ. प्राची जांभेकर, अदाणी फाउंडेशनचे कार्यकारी संचालक वसंत गढवी तसेच अदाणी इलेक्ट्रिसिटीचे वरिष्ठ व्यवस्थापक हजर होते. यावेळी महापालिकेचे शिक्षण अधिकारी, अदाणी फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक, विद्यार्थी, शिक्षक आणि सहाय्यक हजर होते.
उत्थान उत्सव कार्यक्रमात विविध आंतरशालेय सांस्कृतिक, निबंध लेखन, चित्रकला, टाकाऊतून टिकाऊ आदी स्पर्धा घेण्यात आल्या. शिक्षकांसाठी गायन आणि नृत्य स्पर्धा तर पालकांसाठी पौष्टिक टिफिन तयार करणे, गायन, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यात 100 विद्यार्थी, 50 शिक्षक आणि 60 विद्यार्थी सहभागी झाले.
उत्थान प्रकल्प सप्टेंबर 2021 मध्ये सुरू झाला. त्यानंतर या प्रकल्पात महापालिकेच्या 82 गरजू शाळा काटेकोर तपासणीअंती निवडण्यात आल्या. 28 उत्थान सहाय्यकांच्या प्रयत्नांमुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित वर्गातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले आहे.
समाजाच्या सर्वंकष विकासासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटी कटिबद्ध आहे. उत्थान प्रकल्प हा त्याचाच पुरावा आहे, त्यायोगे विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करून मुंबई चे भवितव्य उज्वल केले जाईल, असे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले.
उत्थान प्रकल्पातून झालेले फायदे
मुलांचे गणिती कौशल्य - 98 % आणि अन्य शिक्षण कौशल्य 90 टक्के वाढले.
अतीव समाधान - 99.31 टक्के विद्यार्थ्यांनी उत्थान उपक्रमालात चांगला किंवा बरा असा शेरा दिला.
वाचन संस्कृती - या उपक्रमात 80 वाचन कोपरे निर्माण करून तेथे इंग्रजी, हिंदी आणि मराठीतील बारा हजार आठशे पुस्तके ठेवण्यात आली.
नेत्र तपासणी-या उपक्रमात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून जरूर त्यांना चष्मही देण्यात आले. पालक सहभाग या कार्यक्रमात पाचशे आयांना दरमहा बैठकांसाठी बोलावून किंवा त्यांच्या घरी जाऊन माहिती देण्यात आली
शिक्षक सक्षमीकरण - राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 शी संलग्न असलेली प्रशिक्षण सत्रेही नियमितपणे घेण्यात आली.
व्यवस्थित तयार करून घेतलेले अभ्यासक्रम, शिक्षणाच्या तसेच शिकवण्याच्या परिणामकारक पद्धती आणि वाचन संस्कृतीवर भर यामुळे हा प्रकल्प यशस्वी होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशनच्या उत्थान सीएसआर प्रकल्पामुळे आमच्या शिक्षणात बराच सकारात्मक बदल झाला. त्यामुळे आमच्या शिक्षण कौशल्यात चांगलीच वाढ झाली असून आमच्यासाठी आता शिकणे अत्यंत सोपे आणि मजेदार झाले आहे. वेगळ्या शिक्षण पद्धती तसेच डिजिटल संसाधने आणि प्रात्यक्षिके यामुळे आम्हाला गणित आणि भाषा या विषयात खूप आत्मविश्वास आला, असे निधी अडसुरे या चेंबूर नाका मराठी शाळेतील विद्यार्थिनीने सांगितले.
तर या प्रकल्पामुळे वंचित समुदायातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचत आहे. तसेच आमच्या शाळांचेही परिवर्तन होत आहे, असे मरवली मराठी महापालिका शाळेच्या प्राचार्य श्रीमती जयश्री चव्हाण म्हणाल्या.
नुकतीच अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशनने महापालिकेच्या सहकार्याने शिष्यवृत्तीच्या तयारीसाठीची वीस हजार पुस्तके साडेपाच हजार विद्यार्थ्यांना दिली. तसेच 82 शाळांमध्ये बारा हजार लायब्ररीची पुस्तकेही दिली. त्याचा फायदा पंचवीस हजार विद्यार्थ्यांना होईल.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)