Ganeshotsav 2025 : गणेशोत्सव दणक्यात साजरा करणाऱ्या मुंबईकरांच्या आणि गणेशोत्सव मंडळांच्या उत्साहात भर पडणार आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटीने गणेशोत्सव मंडपामध्ये निवासी दरात तात्पुरत्या वीज जोडण्या देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे साऱ्या मुंबई शहरात गणेशोत्सवादरम्यान गणेशोत्सव मंडळांना सातत्यपूर्ण वीज पुरवठा मिळेल.
यासाठी गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केल्यानंतर 48 तासांच्या आत त्यांना तात्पुरती वीज जोडणी मिळेल. यासाठी गणेशोत्सव मंडळांना अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या वेबसाईटवर जाऊन न्यू कनेक्शन विभागात तात्पुरत्या वीज जोडणीसाठी अर्ज करता येईल.
गणेशोत्सव मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात सातत्यपूर्ण आणि खात्रीशीर वीज पुरवठा देऊन आम्ही या उत्सवातील उत्साह आणखीन वाढवण्याची खात्री देत आहोत. ग्राहकांची अथक आणि चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचा आमचा निर्धारच यातून दिसून येत आहे, असे अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या प्रवक्त्याने याबाबत सांगितले.
गेल्या वर्षी आम्ही शहरातील 986 गणेशोत्सव मंडपांना अखंड वीजपुरवठा दिला होता. या उत्सवादरम्यान देखील आम्ही मंडपांना तात्काळ तात्पुरती वीज जोडणी देण्यासाठी आणि त्यांना सातत्यपूर्ण अखंड वीज पुरवठा करण्याची पूर्ण तयारी केली आहे. तसेच याबाबत कोणतीही समस्या आल्यास ती सोडवण्यासाठी आमची शीघ्र प्रतिसाद पथके शहरात मोक्याच्या जागी तैनात करण्यात आली आहेत, असेही प्रवक्त्याने सांगितले.
( नक्की वाचा : Logistics Park : अदाणी समूहाकडून कोचीमधील 600 कोटींच्या लॉजिस्टिक्स पार्कचं भूमिपूजन )
गणेशोत्सव मंडपात भेटी देणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी मंडळांनी वीज जोडणी तसेच वीज सजावट, दिवे आदी कामांसाठी अधिकृत परवानाधारक वीज कंत्राटदारांची सेवा घ्यावी, असे आवाहन अदाणी इलेक्ट्रिसिटी करीत आहे. तसेच गणेश विसर्जनाच्या ८० ठिकाणी आम्ही फ्लड लाईट सह प्रकाशझोतांची व्यवस्था केल्याचेही प्रवक्त्याने सांगितले.
गणेशोत्सवात मंडळांनी काय करावे आणि काय करू नये याची मार्गदर्शक तत्वे
हे करावे
- मंडळात विजेचे वायरिंग व्यवस्थित असावे
- मीटर केबिनमध्ये जाण्याची परवानगी फक्त अधिकृत व्यक्तीलाच द्यावी
- वीज जोडण्यांसाठी दर्जेदार वायरी आणि स्विच वापरावेत
- आपातकालीन स्थितीत संपूर्ण मंडपाचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी एकच स्विच असावा
- आवश्यक असेल तेथे वायरी जोडण्यासाठी दर्जेदार चिकटपट्ट्यांचा वापर करावा
- मीटर केबिन आणि स्विच जवळ जाण्याच्या रस्त्यात कोणतेही अडथळे नसावेत
- जोडण्यांसाठी मंजूर झालेल्या भारापेक्षा मंडपातील वीजभार जास्त नसावा याची काळजी घ्यावी
- ठरलेल्या मानकांनुसार व मंजूर भारानुसार दर्जेदार वायरी, एम सी बी आणि एल सी बी यांचा वापर करावा
- जनरेटर आणि बॅकअप जनरेटर यांच्यासाठी सुयोग्य अर्थिंग आणि न्यूट्रल यांची व्यवस्था असावी
- एक्सटेंशन वायरिंग साठी थ्री पिन प्लग चा वापर करावा
- मीटर केबिनजवळ अग्निशमन उपकरण सज्ज असावे आणि ते कसे वापरावे याच्या सूचनाही तेथे लिहिलेल्या असाव्यात
- मीटर केबिन जवळ धोकादायक चिन्ह असलेला फलक लावून ठेवावा
- मीटर केबिनला सुयोग्य अर्थिंग करावे
हे करू नका
- कोठूनही थेट वीजपुरवठा घेऊ नका किंवा अवैधरित्या अतिरिक्त जोडणी घेऊ नका
- वायरींना अनावश्यक छेद देऊ नका
- मीटर केबिनच्या रस्त्यात अडथळे ठेऊ नका
- मंजूर भारापेक्षा जादा वीज भार होऊ देऊ नका
- प्रकाश झोताचे दिवे, पंखे, चिकटपट्टीने चिकटवलेल्या वायर चे जॉईंट येथे लोकांना जाऊ देऊ नका
- मीटर केबिनच्या जवळ किंवा केबिनमध्ये धोकादायक सामुग्री ठेवू नका
- मीटर केबिन आणि वायरिंग यांना धातूच्या खांबांचा आधार देऊ नका.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)