Political News : "त्यांच्या बापाला मी कळलो...", विधानसभेत आदित्य ठाकरे-गुलाबराव पाटलांमध्ये खडाजंगी

Aditya Thackeray VS Gulabrao Patil : रोहित पवारांनी विचारलेला प्रश्न समजलाच नाही असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. यावर रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी कामकाजाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी प्रश्न समजावतो, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

जाहिरात
Read Time: 3 mins

राज्यातील दूषित पाण्याच्या मुद्दावरुन विधानसभेत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान मंत्री गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायले मिळाले. आमदार रोहित पवार यांनी भूजलातील नायट्रोनचे वाढते प्रमाण आणि यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना लागण होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. याबाबत सरकार काही धोरण करणार आहे का? असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला होता. 

मात्र रोहित पवारांनी विचारलेला प्रश्न समजलाच नाही असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. यावर रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी कामकाजाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी प्रश्न समजावतो, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. गुलाबराव पाटलांनी प्रश्नाचं उत्तर दिलं मात्र अनेक सत्ताधारी आणि विरोधक आमदारांना ते उत्तर पटलं नाही.

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आदित्य ठाकरे काय म्हणाले? 

गुलाबराव पाटलांच्या उत्तरावर आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, "विधीमंडळात अनेक मंत्री अभ्यास करुन येतात. मुख्यमंत्री देखील प्रश्नांची स्वत: उत्तरे देतात. उपमुख्यमंत्री देखील उत्तरे देतात. अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे याबाबत आपल्या दालनात एक बैठक बोलवावी. आपलं राज्य कृषिप्रधान आहे, औद्योगिक आहे. अशी बोटे दाखवून चालणार नाही. यांना खातं कळलं की नाही हा मूळ प्रश्न आहे. मंत्र्यांनी खात्याचा अभ्यास करुन यायला पाहिजे. इथे अनेक प्रश्न आहेत, मात्र मंत्री उत्तरे देऊ शकत नाहीत. अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे  हा प्रश्न राखीव ठेवावा. मंत्र्यांना सांगा अभ्यास करुन उत्तर द्या." 

Advertisement

नक्की वाचा - Abu Azmi : सपाचे आमदार अबु आझमी निलंबित, औरंगजेबाबद्दल नेमकं काय म्हणाले होते?

आदित्य ठाकरे यांच्या टीकेनंतर तिळपापड झालेल्या गुलाबराव पाटील यांनी बोलताना म्हटलं की, "त्यांच्या बापाला मी कळलो होतो. म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं. हे त्यांना कळलं नाही." यावर लगेचच आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, "म्हणून तर तुम्ही पळून गेले होते." अखेर विधानसभा अध्यक्षांना मध्यस्थी केली आणि वाद थांबवला.  

Advertisement

रोहित पवारांच्या प्रश्नावर गुलाबराव पाटलांचं उत्तर 

रोहित पवारांच्या प्रश्नावर उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, "राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वेगळ्या यंत्रणा आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पाणी तपासणीत फरक आहे. राज्य सरकार प्रत्येक स्त्रोत आहे तिथे तपासणी करते. केंद्र सरकारने तपासलेल्या पाण्याच्या नमुन्यामध्ये 35 टक्के नायट्रेटचे प्रमाण आहे. तर राज्य सरकारने केलेल्या तपासणीत 11 टक्के नायट्रेटचे प्रमाण आढळले आहे. युरियाच्या वापरामुळे नायट्रेटचे प्रमाण वाढते. त्यामुळे यात कृषी खात्याला देखील विश्वासात घ्यावं लागेल. शेतकऱ्यांमध्ये देखील याबाबत जनजागृती करावी लागली. शेतकऱ्यांना शेण खत वापरण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे." 

(नक्की वाचा - Akola Crime : पत्नी परीक्षेसाठी माहेरी; पतीने मामेबहिणीला पळवून केलं लग्न; तरुणीचा पोलीस ठाण्यात राडा )

नाना पटोले यांनी यावर म्हटलं की, "रासायनिक खतांचा वापर कमी करावं असं सांगितलं. मात्र दूषित पाणी नद्यांमध्ये सोडलं जातं त्यामुळे ही समस्या वाढत आहे. अनेक आजार यामुळे वाढत आहे. केवळ शेतकऱ्यांवर बोट ठेवणे चुकीचे आहे. यासाठी शेतकरी दोषी कसा असेल."

"एमआयडीसीमध्ये दूषित पाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. अनेक ठिकाणी पाणी जमिनीत सोडलं जाते. मात्र कालांतराने याचा परिणाम आजूबाजूच्या 15-20 किमी परिसरात होतो. तसेच मंत्री महोदय म्हणाले शेण खताचा वापर करावा. तर सरकार शेतकऱ्यांना शेण खत उपलब्ध करुन देणार आहे का? असा प्रतिप्रश्न भाजप आमदार प्रशांत बंब यांनी विचारला.