Ajit Pawar Jayanti 2026: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली असून आयुष्याचा साथीदार गमावल्याचे दुःख आणि त्यांच्या आठवणी व्यक्त करताना त्यांच्या शब्दांतून वेदना स्पष्टपणे जाणवत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ही पोस्ट वाचून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
'हा दिवस जयंती म्हणून स्वीकारायला मन तयार नाही'
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टची सुरुवात 'दादा...' या शब्दाने केली आहे. जुन्या दिवसांतील वाढदिवसाच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी लिहिले आहे की, "एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. त्यावेळी घर, कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा." पण आजची भयान शांतता आणि वास्तव मांडताना त्या म्हणतात, "आज तुमचा हाच दिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा..."
'सगळं अचानक हरवलं, पोरकं झालं...'
अजित पवार यांच्या खंबीर सोबतीची आठवण काढताना सुनेत्रा वहिनींनी लिहिले आहे की, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते त्यांची सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिले. "तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ... आज हे सगळं अचानक हरवून गेलंय. सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही," अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. काळाने त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असा विचारही त्यांनी कधी स्वप्नात केला नव्हता, असे त्या म्हणाल्या.
(नक्की वाचा: Cabinet Decisions: पुण्यात NDRF ला कायमस्वरूपी तळासाठी जमीन, राज्य मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय!)
'तुमचे विचार आणि प्रेम माझ्या कणाकणात जिवंत राहील'
अजित पवारांच्या आठवणीत डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नसल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी पुढे लिहिले आहे की, "दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील."
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भावुक पोस्ट
पोस्टच्या शेवटी सुनेत्रा पवार यांनी आपल्या आयुष्याच्या साथीदाराला आणि त्यांच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम केला आहे. सोशल मीडियावर सुनेत्रा पवार यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात असून, त्यांच्या या भावना वाचून सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्तेही भावुक झाले आहेत.