Pune Land Scam : पार्थ पवारांच्या वादग्रस्त जमीन व्यवहारावर अजितदादांचा 'हात वर', दिली धक्कादायक प्रतिक्रिया

Pune Land Scam : पुण्यातील सुमारे 1800 कोटी रुपये किमतीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अखेर मौन सोडले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune Land Scam : मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असं अजित पवार यांनी म्हंटलं आहे.
पुणे:

Pune Land Scam : पुण्यातील सुमारे 1800 कोटी रुपये किमतीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी  पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अखेर मौन सोडले आहे. या संपूर्ण प्रकरणाशी आपला दुरान्वयेही संबंध नसल्याचे सांगत त्यांनी थेट हात झटकले आहेत. हा संपूर्ण व्यवहार वादग्रस्त ठरत असताना, अजित पवारांच्या पहिल्या प्रतिक्रियेनं  राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, ''सध्या माध्यमांमध्ये जे काही सुरू आहे, त्याची संपूर्ण माहिती मला नाही. माझा त्या गोष्टीशी थेट अजित पवार म्हणून दुरान्वयेही संबंध नाही. राज्यातील जनता मला गेली 35 वर्ष ओळखते. मी या निमित्ताने संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलं आहे."

मागे 3-4 महिन्यांपूर्वी काही चुकीचं सुरू असल्याचं माझ्या कानावर आलं, त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं होतं की, असल्या चुकीच्या गोष्टी कुणीही करू नये, असलं काहीही चालणार नाही. पण त्यानंतर काय झालं हे मला माहिती नाही. सध्या चॅनेलमध्ये वेगवेगळ्या जमिनींबाबत जे काही सांगितलं जात आहे, त्याची इत्यंभूत माहिती, कागदपत्रे आणि कुणी परवानगी दिली, याची मी स्वतः चौकशी करणार आहे.

( नक्की वाचा :  Pune Land Scam : पुण्यात पुन्हा भूखंडाचा खेळ!पार्थ पवारांच्या वादात अडकलेले तहसीलदार दुसऱ्याच घोटाळ्यात उडाले! )
 

आजवर कधीही....

अजित पवार यावेळी बोलताना पुढे म्हणाले की,  'आजवर माझ्या कोणत्याही जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांना फायदा मिळवून देण्यासाठी एकाही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही. उपमुख्यमंत्री म्हणून मी सर्व अधिकारी वर्गाला आणि सर्वांना सांगतो की, माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल, नियमात न बसणारं करत असेल, तर त्याला कोणताही माझा पाठिंबा नसेल. मी कायद्याच्या आणि नियमांच्या चौकटीत बसून काम करणारा कार्यकर्ता आहे."

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी!


विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली असताना, अजित पवारांनी स्वतःच चौकशीला पाठिंबा दिला आहे. "या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरूर करावी, तो त्यांचा अधिकार आहे. उद्या कोणत्या बाबतीत कुणी तक्रार केली, तर चौकशी करून त्याची सत्यता पडताळणे, त्यामध्ये नक्की काय घडलं हे पाहणे, हे सरकारचं काम आहे," असे  मत अजित पवारांनी व्यक्त केले.

पार्थ पवारांवर नेमके काय आहेत आरोप?

पुण्यातील कोरेगाव पार्क (Koregaon Park) भागातील सुमारे 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे वादात सापडले आहेत. आरोपानुसार, पार्थ पवार यांच्या 'अमेडिया' (Amadea) कंपनीने, ज्यामध्ये त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील भागीदार आहेत, ही जमीन खरेदी केली.

Advertisement

जमिनीची बाजार किंमत सुमारे 1800 कोटी रुपये असताना, ती केवळ 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली, असा मुख्य आरोप आहे. या व्यवहारातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे, यासाठी लागणारी तब्बल 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटीही माफ करण्यात आली आणि संपूर्ण व्यवहार केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे.

ही जमीन सरकारी (महार वतन) असून त्यावर गैरव्यवहार करून डल्ला मारण्यात आला, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यांनी हा व्यवहार रद्द करण्याची आणि या प्रकरणाची SIT (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्याची मागणी करत अजित पवारांना लक्ष्य केले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article