सूरज कसबे, प्रतिनिधी
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याची लगबग सुरू असतानाच, आळंदीतून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. माऊलींच्या पालखी रथाला आपलीच बैलजोडी असावी आणि माऊलींची सेवा करण्याची संधी मिळावी, या श्रद्धेपायी एका मानकऱ्याने थेट आपल्या कुटुंबासह आणि स्वतःच्या बैलजोडीसह संजीवन समाधी मंदिराबाहेर उपोषण सुरू केले आहे. वारी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना, रथाच्या बैलजोडीवरून मानकऱ्यांमधील अंतर्गत वाद आता थेट मंदिराच्या दारात आणि चव्हाट्यावर आल्यामुळे संपूर्ण आळंदी परिसरात आणि वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका काय आहे वाद?
कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीतील काही ठराविक घराण्यांना परंपरेने मिळाला आहे. यंदा हा मान रानवडे घराण्याकडे आला आहे. या मानाच्या बैलजोडीची निवड करण्यासाठी एक विशेष बैलजोडी समिती कार्यरत असते. या समितीने यंदाच्या सोहळ्यासाठी तुळशीराम रानवडे आणि हर्षवर्धन रानवडे यांच्या नावांची शिफारस देवस्थानकडे केली होती.
या शिफारशीला मंजुरी मिळाल्यानंतर तुळशीराम रानवडे यांनी हिंजवडीतील शेतकरी जीवन जांभूळकर यांच्याकडून राम आणि सूर्या नावाची पांढरीशुभ्र खिल्लार जातीची देखणी बैलजोडी खरेदी केली. मात्र, याच रानवडे कुटुंबातील उमेश रानवडे यांनी या संपूर्ण निवड प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेतले आहेत.
( नक्की वाचा : Pune News: खडकवासला प्रकल्पात मुबलक साठा असूनही पुणेकर तहानलेलेच राहणार? टँकर लॉबीला श्रीमंत करण्याचा डाव? )
मानकऱ्याचा गंभीर आरोप
उमेश रानवडे यांनी केलेल्या आरोपानुसार, यंदा मान आमच्या घराण्याला असताना निवड समितीने आमच्या नावाचा विचार का केला नाही आणि आम्हाला जाणीवपूर्वक का डावलले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मला वैयक्तिक कोणताही मान नको आहे, पण माऊलींच्या पालखी सोहळ्यात माझ्या बैलजोडीच्या रूपाने मला सेवा करण्याची संधी मिळायलाच हवी, अशी आर्त भावना उमेश रानवडे यांनी व्यक्त केली आहे. हीच मागणी लावून धरत त्यांनी मंदिराबाहेर आंदोलन पुकारले आहे.
कशी होते माऊलींच्या रथासाठी बैलांची निवड?
माऊलींच्या पालखी रथाला जुंपण्याचा मान आपल्या बैलांना मिळावा, ही महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याची मोठी इच्छा असते. यासाठी दरवर्षी राज्यभरातून अनेक शेतकरी देवस्थानकडे अर्ज करत असतात. आलेल्या अर्जांमधून बैलजोडी निवड समिती अत्यंत चोखंदळपणे सर्वोत्कृष्ट, देखण्या आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेल्या बैलजोडीची निवड करते.
निवड झालेल्या बैलांना वारीच्या काळात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विशेष प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये बैलांना डांबरी रस्त्यावर चालवण्याचा सराव करून घेणे, पोहण्याचे प्रशिक्षण देणे, त्यांचा विशेष खुराक निश्चित करणे आणि मुख्य म्हणजे वारीतील लाखो भाविकांच्या गर्दीत बैल बिथरू नयेत म्हणून विशेष व्यायाम दिला जातो.
( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट, सोमवारपासून लागू होणार नवे वेळापत्रक, 'या' गोष्टींवर निर्बंध! )
आळंदीत उलटसुलट चर्चा
दरवर्षी वारीच्या काळात मानाच्या बैलजोडीची निवड हा अत्यंत आदराचा आणि कौतुकाचा विषय असतो. मात्र, यंदा वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना आणि सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच, रानवडे कुटुंबातील हा अंतर्गत वाद थेट माऊलींच्या मंदिराच्या दारात पोहोचला आहे.
मानकऱ्याने आपल्या बैलांसह घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे आळंदी देवस्थान आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, या वादावर आता काय तोडगा निघणार याकडे सर्व वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.