Ambernath: 'आधी सापाचा फोटो दाखवा, मगच उपचार करू'; अंबरनाथच्या चिमुरड्याने गमावले प्राण! डॉक्टर म्हणतात...

Ambernath News: रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तत्परतेने उपचार करणे गरजेचे होते, मात्र तिथे वेगळाच प्रकार घडल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ambernath News: संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला.
अंबरनाथ:

Ambernath News: काळजाचा थरकाप उडवणारी आणि वैद्यकीय यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात खेळत असलेल्या अवघ्या 3 वर्षांच्या चिमुरड्याला एका विषारी सापाने दंश केला. पोटचा गोळा अचानक मृत्यूच्या दारात जात असल्याचे पाहून घाबरलेल्या पालकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी जे काही सांगितले, ते ऐकून कोणाचाही विश्वास बसणार नाही. 

आधी आम्हाला चावलेल्या सापाचा फोटो दाखवा, तरच आम्ही पुढचे उपचार सुरू करू, असा अजब आणि तितकाच संतापजनक पवित्रा डॉक्टरांनी घेतल्याचा गंभीर आरोप आता मुलाच्या पालकांनी केला आहे. सापाचा फोटो शोधण्याच्या आणि डॉक्टरांच्या याच हलगर्जीपणामुळे अखेर त्या निष्पाप चिमुरड्याचा तडफडून मृत्यू झाला आहे.

Advertisement

एकीकडे वेळेत उपचार न मिळाल्याने चिमुरड्याचा जीव गेल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला, तर दुसरीकडे डॉक्टरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वैद्यकीय क्षेत्रातील संवेदनशीलता संपली आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.


( नक्की वाचा : NEET Paper Leak : सीबीआयच्या रडारवर आता कल्याणची विद्यार्थिनी; 'तो' मोबाईल नंबर ठरला तपासाचा मुख्य धागा )
 

अंबरनाथमधील चिमुरड्याचा दुर्दैवी अंत

हा अत्यंत वेदनादायक आणि दुर्दैवी प्रकार अंबरनाथ येथील शिवमंदिर कैलास कॉलनी भागात घडला आहे. येथे राहणारा सुलतान शेख हा अवघा 3 वर्षांचा मुलगा आपल्या घरात नेहमीप्रमाणे खेळत होता. खेळता खेळता अचानक एका विषारी सापाने त्याच्या कमरेला जोरदार दंश केला. 

मुलगा मोठ्याने रडू लागल्याने आणि तिथे साप दिसल्याने कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. सुलतानच्या कुटुंबाने एका सेकंदाचाही विलंब न लावता त्याला तातडीने उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर सुरू झालेल्या गोंधळातच या चिमुरड्याची प्राणज्योत मालवली.

( नक्की वाचा : Dombivli News: 'अधिकारी मार खाल्याशिवाय राहणार नाही'; डोंबिवलीत विजेच्या मुद्द्यावरून भाजपाचा जोरदार राडा )

सापाच्या फोटोच्या मागणीचा गंभीर आरोप

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तत्परतेने उपचार करणे गरजेचे होते, मात्र तिथे वेगळाच प्रकार घडल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. सुलतानच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलावर तातडीने औषधोपचार सुरू करण्याऐवजी सापाचा फोटो मागितला. जोपर्यंत तुम्ही चावलेल्या सापाचा फोटो दाखवत नाही, तोपर्यंत कोणता साप चावलाय हे समजणार नाही आणि तोपर्यंत उपचार करता येणार नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा पालकांनी केला आहे.

Advertisement

डॉक्टरांनी सापाच्या फोटोची मागणी करत उपचार करण्यास कमालीचा उशीर केला. साप विषारी आहे की नाही हे ओळखण्यात आणि फोटोच्या वादात मौल्यवान वेळ वाया गेला. जर डॉक्टरांनी हा अजब हट्ट धरला नसता आणि वेळेवर अँटी स्नेक व्हेनम किंवा इतर आवश्यक उपचार सुरू केले असते, तर आज आमचा मुलगा जिवंत असता, असा टाहो सुलतानच्या आई-वडिलांनी फोडला आहे. उपचार न मिळाल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत शेख कुटुंबीयांनी रुग्णालयात प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

रुग्णालयाने आरोप फेटाळले

नातेवाईकांच्या या गंभीर आरोपांनंतर रुग्णालयात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि प्रशासनाने शेख कुटुंबीयांचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. रुग्णालयाकडून सांगण्यात आले की, मुलाला जेव्हा आणले गेले तेव्हा त्याची प्रकृती आधीच खूप खालावली होती. 

Advertisement

डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारच्या फोटोची मागणी केली नव्हती आणि मुलाला वाचवण्यासाठी वेळेवर सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, विष शरीरात वेगाने पसरल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात नक्की चूक कोणाची, याचा तपास पोलीस करत आहेत.

Topics mentioned in this article