Ambernath News: अंबरनाथमधील हजारो नागरिकांसाठी एक अत्यंत खूशखबर समोर आली आहे. शासकीय जमिनींवर बांधण्यात आलेली अनधिकृत घरं आता अधिकृत होणार असून, त्यांना मालकी हक्काचे स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (जीआर) जारी केला असून, या निर्णयामुळे अंबरनाथमधील हजारो रहिवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
अंबरनाथ शहरात महसूल आणि वनविभागाच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणावर निवासी अतिक्रमणं झाली आहेत. येथील नागरिकांनी उपलब्ध मोकळ्या जागांवर बैठी घरं, चाळी आणि झोपडपट्ट्या बांधल्या, ज्यामुळे मोठ्या वस्त्या निर्माण झाल्या. अंबरनाथमधील जवळपास 70 टक्के भागावर अशा प्रकारची घरं आहेत. मात्र, या जमिनी शासकीय असल्याने शहरात क्लस्टर किंवा एसआरए (SRA) सारख्या पुनर्विकास योजना राबवण्यात मोठे अडथळे निर्माण होत होते.
कुणाला मिळणार मालकी हक्क?
ही अडचण लक्षात घेऊन अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, राज्य शासनाने जीआर काढून सन 2011 पर्यंतची सर्व अनधिकृत निवासी अतिक्रमणं अधिकृत करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या घरांवर कायदेशीर हक्क मिळणार आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: प्रेयसीसमोर 'पेंद्या भाई'चा गेम,कल्याण पोलिसांचा कडक हिसका; आरोपींची भर रस्त्यात उतरवली मस्ती! )
प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी अशी असेल प्रक्रिया
सरकारच्या या निर्णयानुसार प्रत्येक घराला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. यासाठी नागरिकांना प्रथम अंबरनाथ नगरपालिकेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल. अर्जानंतर टीएलआर (TLR) विभागाकडून घराची मोजणी केली जाईल. मोजणी पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि रहिवाशांना त्यांचे अधिकृत प्रॉपर्टी कार्ड सुपूर्द केले जाईल.
मोठ्या लोकवस्तीला होणार थेट फायदा
राज्य सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा अंबरनाथमधील महालक्ष्मीनगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, बारकू पाडा, स्वामी नगर, जावसई, मेटल नगर, बुवापाडा, खुंटवली आणि खामकरवाडी यांसारख्या मोठ्या लोकवस्तीच्या भागांना होणार आहे. हजारो कुटुंबांची घरं अधिकृत होणार असून, भविष्यात त्यांना क्लस्टर किंवा एसआरए योजनेच्या माध्यमातून आपल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणची शिक्षिका रहस्यमयरित्या गायब, 4 दिवसांनी सापडला मृतदेह; पोलिसांनी असा लावला हत्येचा शोध )
नागरिकांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन
आपल्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी नागरिकांनी कुठलाही विलंब न करता लवकरात लवकर नगरपालिकेकडे फॉर्म भरून द्यावेत आणि मोजणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथकरांना केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world