KDMC News: पावसाळा तोंडावर आला की खड्ड्यांचा प्रश्न मुंबई आणि उपनगरांमध्ये नेहमीच ऐरणीवर येतो. पण यावर्षी एका वेगळ्याच विसंगतीमुळे प्रशासकीय कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका विशिष्ट प्रकल्पासाठी महापालिकेकडे डांबर उपलब्ध होते, मात्र सामान्य नागरिकांच्या रोजच्या प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी त्याच डांबराचा तुटवडा का भासतो, असा रोखठोक सवाल आता लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. या दुटप्पी धोरणामुळे कल्याणकरांमध्ये संतापाची लाट असून प्रशासनाला आता याचे उत्तर देणे कठीण झाले आहे.
काय आहे नेमका वाद?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सध्या रस्त्यांच्या दुरवस्थेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला चढवला आहे. अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे पडलेले खड्डे भरण्यासाठी जर डांबर तात्काळ उपलब्ध होऊ शकते, तर मग शहरातील इतर मुख्य रस्ते आणि प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी डांबर का मिळत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाचा हा दुजाभाव कशासाठी, असा सवाल आता नागरिकही विचारू लागले आहेत.
अमृत योजनेच्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती
कल्याण पूर्वेतील आडवली, ढोकळी, पिसवली आणि नेताजी नगर या परिसरात अमृत योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे रस्ते खोदल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते, ज्यामुळे सातत्याने लहान-मोठे अपघात होत होते. या तक्रारींची दखल घेत कुणाल पाटील यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, प्रशासनाने सूचना दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच डांबर उपलब्ध होऊन खड्डे भरण्याचे काम सुरू झाले. या तातडीच्या कामामुळे प्रकल्पासाठी डांबराची कमतरता नाही, हे स्पष्ट झाले आहे.
( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये पुलाच्या कामासाठी खरंच बुद्धमूर्ती हटवल्या का? वाचा प्रशासनाने काय केला खुलासा )
सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
प्रकल्पग्रस्त भागातील खड्डे भरले जात असताना, शहरातील इतर भागांतील अवस्था मात्र बिकट आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व खड्डे भरले जाणे अपेक्षित असताना, अनेक ठिकाणी डांबर उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप होत आहे. केवळ मोठ्या प्रकल्पांना प्राधान्य देऊन सामान्य रहिवाशांना खड्ड्यांतून प्रवास करायला लावणे किती योग्य आहे, असा संताप पाटील यांनी व्यक्त केला आहे. केवळ अमृत योजनेच्या कंत्राटदाराला झुकते माप न देता संपूर्ण शहर खड्डेमुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
( नक्की वाचा : तुमचं पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? भारताची होर्मुजच्या कटकटीतून सुटका, आता या देशातून येणार स्वस्त तेल )
पावसाळ्यापूर्वीच्या कामांचे आव्हान
येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्याने रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे अत्यंत कमी वेळ उरला आहे. खड्डे भरण्यासाठी डांबराचे नियोजन करताना प्रशासनाने सर्व प्रभागांना समान न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कुणाल पाटील यांच्या या सवालानंतर आता केडीएमसी प्रशासन शहरातील इतर खड्डे भरण्यासाठी डांबर उपलब्ध करून देणार का आणि पावसाळ्याआधी कल्याणकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.