जाहिरात

Kalyan News : कल्याणमध्ये पुलाच्या कामासाठी खरंच बुद्धमूर्ती हटवल्या का? वाचा प्रशासनाने काय केला खुलासा

Kalyan News : कल्याणमध्ये प्रस्तावित चार पदरी उड्डाणपुलाच्या कामावरून सध्या पेच निर्माण झाला आहे.

Kalyan News : कल्याणमध्ये पुलाच्या कामासाठी खरंच बुद्धमूर्ती हटवल्या का? वाचा प्रशासनाने काय केला खुलासा
Kalyan News : केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची बाजू मांडली.
कल्याण:

Kalyan News : कल्याणमध्ये प्रस्तावित चार पदरी उड्डाणपुलाच्या कामावरून सध्या पेच निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासन आणि बुद्धभूमी फाउंडेशन आमनेसामने आले आहेत. प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान होणाऱ्या या पुलासाठी करण्यात आलेल्या कारवाईमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. 

काय आहे प्रकरण?

कल्याण पश्चिमेतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान चार पदरी उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेवरील अडथळे हटवण्याची मोहीम महापालिकेने राबवली, मात्र वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या परिसरात करण्यात आलेल्या कारवाईमुळे वादाची ठिणगी पडली आहे. गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन आणि घोषणाबाजी सुरू असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

KDMC ची भूमिका काय?

या वाढत्या वादामुळे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची बाजू मांडली. आयुक्तांच्या दाव्यानुसार, ज्या जागेवर कारवाई करण्यात आली ती जमीन महापालिकेच्या मालकीची असून त्याची अधिकृत नोंद सातबारावर आहे. पुलासाठी ही जागा गरजेची असल्याने अडथळे हटवण्यापूर्वी संबंधितांना रीतसर नोटिसा देण्यात आल्या होत्या आणि वेळोवेळी चर्चाही करण्यात आली होती. 

( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवली हादरली! पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूला पत्नीच जबाबदार? तपासात समोर आले धक्कादायक वास्तव )
 

ही कारवाई करताना परिसरातील गौतम बुद्धांच्या 4 मूर्ती आणि इतर धार्मिक साहित्य सुरक्षितपणे फाउंडेशनच्या प्रतिनिधींकडे सोपवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रशासनावर गंभीर आरोप

दुसरीकडे, बुद्धभूमी फाउंडेशनने महापालिकेचे सर्व दावे फेटाळून लावत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर प्रक्रिया न पाळता 3 बुद्धमूर्ती, 3 बौद्ध स्तूप, भीमा कोरेगावची प्रतिकृती, भिक्खू निवास, धर्मशाळा आणि विहाराची तोडफोड करण्यात आल्याचे फाउंडेशनचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, याला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

( नक्की वाचा : Akola News: NEET पेपरफुटीचे धागेदोरे अकोल्यात; आरसीसीच्या शिक्षकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात )
 

प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

या प्रकरणी केवळ महापालिका आयुक्तच नाही, तर संबंधित अधिकारी, पोलीस आणि पुलाचे काम करणारी कंपनी टीएनटी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी फाउंडेशनने केली आहे. सध्या दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. विकासकामे आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा या वादात आता प्रशासन पुढील काळात काय मध्यममार्ग काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com