जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे डॉ. गणेश राख (Dr Ganesh Rakh).त्यांची प्रेरणादायी कथा उद्योजक आनंद महिंद्रा (Industrialist Anand Mahindra) यांनी नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे. आनंद महिंद्रांनी डॉ. गणेश यांच्या असामान्य माणुसकीचे कौतुक केले आहे. या डॉक्टरची कथा आयएएस अधिकारी डी. प्रशांत नायर यांनी ऑनलाइन शेअर केली होती. त्यानंतर आनंद महिंद्रांचे लक्ष या कथेवर गेले. त्यानंतर त्यांनीही ही कथा पोस्ट करत राख यांचे कौतूक केले आहे.
नायर यांच्या पोस्टनुसार, एका रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराने आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले होते. सिझेरियन डिलिव्हरीचा खर्च कसा भागवायचा, या चिंतेत तो होता. त्यासाठी त्याला आपले घर गहाण ठेवावे लागेल, असे त्याला वाटत होते. बाळंतपण झाल्यावर त्या चिंतित वडिलांनी डॉक्टरांना मुलगा झाला की मुलगी अशी विचारणा केली. डॉ. राख यांनी उत्तर दिले, "तुमच्या घरी एक परी आली आहे." रुग्णालयाच्या फीबद्दल विचारण्यात वडिलांना संकोच वाटत असल्याचे पाहून डॉ. राख म्हणाले, "जेव्हा परी जन्माला येते, तेव्हा मी कोणतीही फी घेत नाही." हे ऐकून त्या वडिलांना गहिवरून आले. त्यांनी डॉ. राख यांच्या पायावर डोके ठेवले. त्यांना आदराने "देव" म्हटले.
विशेष म्हणजे, डॉ. गणेश राख गेल्या एक दशकाहून अधिक काळ आपल्या रुग्णालयात जन्माला आलेल्या मुलींच्या प्रसूतीची फी माफ करत आहेत. 2007 मध्ये आपले रुग्णालय सुरू केल्यापासून त्यांनी "बेटी बचाओ" या त्यांच्या उपक्रमांतर्गत एक हजाराहून अधिक मुलींची मोफत प्रसूती केली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतूक ही होत आहे. मुलीच्या जन्माचे अशा अनोख्या पद्धतीने डॉ. गणेश राख हे स्वागत करतात.
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, की "दोन मुलींचा पिता असल्यामुळे, मला दोन गोष्टी माहीत आहेत, की जेव्हा तुमच्या घरी एक परी जन्माला येते, तेव्हा कसे वाटते. पण हे डॉक्टरदेखील एक देवदूत आहेत. दया आणि उदारतेचे देवदूत आहेत. या पोस्टने मला आठवण करून दिली की, आठवड्याची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग नाही, ज्यात तुम्ही स्वतःला विचारा की तुमचे ध्येय आणि तुमचे काम तुमच्या समाजावर सकारात्मक परिणाम कसे करेल. असे महिंद्रा म्हणाले." एका मुलाखतीत डॉ. राख म्हणाले होते की, जेव्हा लोक मुलींच्या जन्माचा आनंद साजरा करू लागतील, तेव्हा ते पुन्हा फी घ्यायला सुरुवात करतील.
डॉ. गणेश यांच्या कथेने अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे. अनेक लोक या पोस्टवर कमेंट करून त्यांचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले, "देवाने त्यांना चांगेल काम करण्यासाठी पाठवले आहे." दुसऱ्याने कमेंट केली, "खूप छान काम. पण समाजात आजही मुलांबद्दल एवढी क्रेझ का आहे?" असं त्याने लिहीलं आहे. तिसऱ्याने लिहिले, "प्रेरणादायी काम! हा उपक्रम थेट लैंगिक भेदभावावर उपाय करतो. मुलींसाठी मोफत प्रसूती त्यांच्या महत्त्वाबद्दल एक मजबूत संदेश देते. खरा बदल तेव्हा येतो, जेव्हा लोक ठोस पाऊले उचलतात." त्यांच्या 'बेटी बचाओ जनआंदोलन' उपक्रमांतर्गत डॉ. राख, जे पुण्याच्या हडपसर भागात प्रसूती-सह-मल्टीस्पेशालिटी रुग्णालय चालवतात, ते स्त्री-भ्रूणहत्या आणि अर्भकहत्येविरुद्ध जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.