लांडग्यासारखा प्राणी दिसल्याने विक्रोळीकरांमध्ये घबराट, मुलुंडला सापडली 9 फुटी मगर

उत्तर प्रदेशात लांडग्याने मानवावर हल्ला केल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.  या हल्ल्यात किमान 10 जणांचा बळी गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबईच्या पूर्व उपनगरातील रहिवासी विविध प्राणी, जनावरांचे दर्शन होऊ लागल्याने घाबरले आहेत. विक्रोळीमध्ये लांडग्यासारखा प्राणी दिसल्याने कन्नमवार नगर परिसरात दहशत निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशात लांडग्याने मानवावर हल्ला केल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.  या हल्ल्यात किमान 10 जणांचा बळी गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. या 10 जणांपैकी 9 ही लहान मुले आहेत. या लांडग्यांना ठार मारण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्यावर तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: लक्ष ठेवून आहेत. तिथल्या या बातम्या पाहिल्याने विक्रोळीकर जरा जास्तच टेन्शनमध्ये आले आहेत. 

हे ही वाचा : हवामान बदलामुळे डासांची शक्ती चारपट वाढली; संशोधनातून अनेक धोके आले समोर

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना म्हटले की ज्या लोकांनी हा प्राणी पाहिला असावा त्यांची लांडगा आणि कोल्ह्यामध्ये गल्लत झाली असल्याची शक्यता आहे. कन्नमवार नगरचा परिसर हा खाडीलगत आणि खासकरून  खारफुटीला लागून असलेला परिसर आहे. खारफुटीमध्ये कोल्हा राहातो. त्यामुळे विक्रोळीकरांना कोल्हा दिसला असण्याची शक्यता आहे. असे असले तरी वन विभागाचे अधिकारी स्वत: घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत. विक्रोळी कन्नमवार नगर भागात मोठ्या प्रमाणावर इमारतींची बांधकामे सुरू झाली आहेत. या बांधकामांमुळे जनावरांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्याने ते लोकांच्या नजरेस पडू लागले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे जनावरांचा नैसर्गिक अधिवास अबाधित राहावा अशी मागणी प्राणीप्रेमी आणि निसर्गप्रेमी करू लागले आहेत. विक्रोळीमध्ये राहणारे विक्रम सोनावणे यांनी दावा केला आहे की या परिसरात 3-4 लांडगे असण्याची शक्यता आहे. विक्रोळीला लागून असलेल्या डंपिंग परिसरामध्येही लांडगे दिसून आल्याचा दावा कचऱ्याच्या गाड्या चालवणाऱ्यांनी केल्याचे सोनावणे यांचे म्हणणे आहे.

Advertisement

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुलुंडमध्ये सापडली 9 फुटांची मगर

मुलुंड पश्चिमेला असलेच्या लाल बहादूर शास्त्री (LBS Road) मार्गावरील एका इमारतीमध्ये रविवारी सकाळी मगर सापडली. सोसायटीच्या वॉचमनला ही मगर पहाटे 5.30च्या सुमारास दिसली होती. ही मगर दिसल्यानंतर प्राणीमित्रांना त्याबाबत कळवण्यात आले. प्राणीमित्रांनी ही मगर पकडली आणि तिला पहिले प्राण्यांच्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेले. ती मादी असून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी हरकत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर या मगरीला पुन्हा तलावामध्ये सोडून देण्यात आले. ही मगर इथपर्यंत कशी आली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article