OLA, Uber strike: राज्यातील ॲप आधारित कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार, 9 ऑक्टोबर 2025 रोजी एक दिवसीय बंदची हाक दिली आहे. भारतीय गिग कामगार मंचाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे.
देशभरातील वित्त विषयाचे तज्ज्ञ 9 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत येणार आहेत आणि याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मुंबईत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे आणि चालकांच्या समस्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी याच दिवशी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय गिग कामगार मंचाचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी या बंदचे आवाहन केले आहे.
(नक्की वाचा- वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आता चाप ! 45 दिवसांत चलान भरा , अन्यथा आरटीओ...)
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
- इंधन आणि देखभाल खर्चात प्रचंड वाढ झाली असताना, चालकांचे उत्पन्न कमी झाले आहे. तक्रारींचे निराकरण करण्यासाठी योग्य व्यवस्था नाही.
- राज्य परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ॲग्रीगेटर्सवर कठोर कारवाई करावी.
- चालकांना योग्य वेतन आणि विमा लाभ मिळावेत.
- ॲप कंपन्यांकडून पारदर्शक भाडे संरचना लागू करावी.
- ॲप कंपन्यांकडून मनमानीपणे चालकांची खाती निलंबित करणे थांबवावे.
बैठका होऊनही तोडगा नाही
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 30 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या आंदोलनानंतर या समस्येवर तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांचे सचिव विद्याधर महाले यांनी आंदोलक आणि परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे निर्देश परिवहन विभागाचे प्रभारी अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांना दिले होते. मात्र, या बैठका होऊनही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असे डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले आहे.