Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक 'औरंगपुरा' भागाचे नाव बदलून आता 'संभाजी पेठ' असे करण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपने मांडलेल्या या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी देण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल पाटील, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहराचे नाव बदलल्यानंतर आता विविध भागांच्या नामांतराच्या प्रक्रियेला वेग आला आहे. शहरातील अत्यंत गजबजलेला आणि ऐतिहासिक ओळख असलेला 'औरंगपुरा' हा भाग आता इतिहासजमा झाला असून, या भागाचे नामकरण 'संभाजी पेठ' असे करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

भाजपचा प्रस्ताव आणि सभागृहात खडाजंगी

भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिकेत औरंगपुरा भागाचे नाव बदलून ते स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीप्रत्यर्थ 'संभाजी पेठ' करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावरून सभागृहात जोरदार चर्चा झाली. ठाकरे गटाचे नगरसेवक राशिद मामू यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला, मात्र भाजपने बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर करून घेतला. 

Advertisement

(नक्की वाचा-  Dadar Railway Station: दादर स्थानकात मोठा बदल होणार, प्लॅटफॉर्म क्रमांकही बदलणार)

अस्मितेचा विषय की राजकीय रणकंदन?

हा ठराव मंजूर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, हा शहराच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली आहे. मात्र, या निर्णयामुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. औरंगपुऱ्यासारख्या जुन्या भागाचे नाव बदलल्यामुळे आता शहरातील इतरही ऐतिहासिक किंवा जुन्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागांच्या नामांतराची मागणी जोर धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(नक्की वाचा- TCS Nashik Case: वरिष्ठांचा छळ आणि लैंगिक शोषण का सहन केलं? एका पीडितेबाबत मन सुन्न करणारी माहिती समोर)

पुढील कार्यवाही काय?

महानगरपालिकेत ठराव मंजूर झाल्यामुळे आता प्रशासकीय स्तरावर नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू होईल. यामध्ये प्रामुख्याने शहरातील दिशादर्शक फलक बदलले जातील. सरकारी दप्तरी आणि महापालिकेच्या रेकॉर्डमध्ये 'संभाजी पेठ' या नावाची नोंद केली जाईल. गुगल मॅप्स आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर नाव अपडेट करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाईल. शहराचे नाव बदलल्यानंतरचा हा एक मोठा प्रशासकीय आणि राजकीय बदल मानला जात आहे.
 

Topics mentioned in this article