बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं पुणे कनेक्शन उघड, बिश्नोई टोळीचं बनलंय राज्यातील ठाणं?

Baba Siddique Murder Case : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (12 ऑक्टोबर) रोजी हत्या करण्यात आली. या हत्येचं पुणे कनेक्शन उघड झालं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

राहुल कुलकर्णी, रेवती हिंगवे, प्रतिनिधी

Baba Siddique Murder Case : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (12 ऑक्टोबर) रोजी हत्या करण्यात आली. मुंबईत शिवसेनेच्या दोन गटांच्या दसरा मेळाव्यामुळे पोलीस हाय अलर्टवर असताना ही घटना घडली. राजकारण, रिअल इस्टेट, बॉलिवूड या वेगवेगळ्या क्षेत्रात दबदबा असलेल्या सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्येचं पुणे कनेक्शन उघड झालं आहे. 

सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पकडण्यात आलेल्या एका आरोपीचं काही काळापूर्वी पुण्यातच वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पुणे कनेक्शनचा सखोल तपास करण्यात येत आहे. सिद्दीकी यांच्या खुनाच्या कटाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचत असल्याचं समोर आलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बिश्नोई टोळीचं राज्यातील ठाणं 

पंजाबमधील काँग्रेस नेता, प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण, तसेच अभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई टोळीनं सिद्दीकी यांच्या हत्येचा दावा केला आहे.  बिष्णोई टोळीने पुण्यातील सराईतांशी संधान बांधल्याचे यापूर्वी उघडकीस आले होते. मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील दोघांना अटकही करण्यात आली होती. या टोळीचं पुणे नवीन ठाणं होत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधव याला गुजरामधून अटक केली होती. त्याला आश्रय देणारा नवनाथ सूर्यवंशी आणि सिद्धेश उर्फ महाकाल कांबळे यांनाही अटक केली होती. तिघांचा बिष्णोई टोळीशी संबंध असल्याचे उघडकीस आले होते. संतोष जाधव मूळचा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावातील रहिवासी, तर कांबळे मूळचा नारायणगावचा…, कांबळेचा साथीदार सूर्यवंशी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आहे. 2021 मध्ये जाधव याने पूर्ववैमनस्यातून मंचर परिसरात ओंकार ऊर्फ राण्या आण्णासाहेब बाणखेले याच्यावर गोळीबार करून खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर जाधव पसार झाला होता. पसार झाल्यानंतर जाधव बिष्णोई टोळीतील सराईतांच्या संपर्कात आला.

( नक्की वाचा : बिश्नोई गँगचा सूत्रधार कोण? सातासमुद्रापार बसून कशी चालवली जाते गँग? )

सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी समाज माध्यमात संदेश प्रसारित करणाऱ्या शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण याला रविवारी पोलिसांनी अटक केली. शुभम सध्या फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. त्याचा भाऊ प्रवीण लोणकर वारजे परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला पकडले.

सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वीही पुण्यातील वारजे भागातील एका तरुणाने समाज माध्यमात मजकूर लिहिल्याचे आढळले आहे. या संदेशात लॉरेन्स बिष्णोई, त्याचा भाऊ अमोल बिष्णोई यांच्या नावाने सिद्दीकी यांना धमकाविण्यात आले आहे.

सिद्दीकी यांची शनिवारी रात्री वांद्रे भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील दोघांना अटक करण्यात आली. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून, त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. सिद्दीकी प्रकरणात अटक करण्यात आलेला शिवानंदन उर्फ शिवा हासुद्धा ५ महिन्यांपूर्वी पुण्यात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे. शिवा पुण्यात भंगार मालाच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्या दृष्टीने मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाकडून पुण्यात तपास सुरू करण्यात आला आहे.

( नक्की वाचा : Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांची हत्या का झाली? पोलीस तपास कोणत्या दिशेने? )

सिद्दीकी यांच्या खुनाच्या कटाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचत असल्याचे यातून समोर येत आहे. त्यामुळे आधीच नाना कारणामुळे चर्चेत असलेले पुणे पुन्हा एकदा चर्चेत आले.