'या' शिवसैनिकासाठी बाळासाहेबांनी थांबवली होती स्वत:ची सभा!

त्यांचं नातं हे इतकं घट्ट होतं की त्यांच्यासाठी एकदा बाळासाहेबांनी स्वत:ची सभा देखील थांबवली होती. विश्वास बसला नाही ना? पण, हे सत्य आहे.

Advertisement
Read Time3 min
'या' शिवसैनिकासाठी बाळासाहेबांनी थांबवली होती स्वत:ची सभा!
ठाणे:

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं आजन्म दैवत असलेली व्यक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे. शिवसेनाप्रमुखांच्या प्रत्येक आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व  शिवसेना कार्यकर्ते जीवाचं रान करत असत. मातोश्रीवरुन आलेला आदेश हा शिवसैनिकांसाठी अखेरचा शब्द असे. बाळासाहेब ठाकरे  बाळासाहेब हे महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी राजकारणाचा प्रमुख चेहरा होते. त्याचवेळी अनेक मुस्लीम कार्यकर्तेही त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आले होते.यामधील एक मुस्लीम नेता  शेवटपर्यंत बाळासाहेबांच्या सोबत राहिला. त्यांचं नातं हे इतकं घट्ट होतं की त्यांच्यासाठी एकदा बाळासाहेबांनी स्वत:ची सभा देखील थांबवली होती. विश्वास बसला नाही ना? पण, हे सत्य आहे. कोण आहेत हे नेते? ते शिवसेनेत कसे आले? त्यांचा राजकीय प्रवास कसा होता? त्यांचं आणि बाळासाहेबांचं नातं कसं होतं? हे सगळं समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचा

बाळासाहेबांचा मुस्लिम मावळा

शिवसेनेनं मुंबई पाठोपाठ ठाण्यात सर्वात लवकर आणि घट्ट बस्तान बसवलं. ठाणे शहर आणि परिसरात आनंद दिघे यांचं शिवसेनेच्या विस्तारात मोठं योगदान होतं. तर कल्याण आणि परिसरात साबीर शेख यांनी शिवसेनेची धूरा सांभाळली. 1995 साली शिवसेना-भाजपा युतीचं सरकार सत्तेवर आलं.मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्या मंत्रिमंडळातील ते एकमेव मुस्लीम चेहरा होते. त्यांच्याकडं कामगार मंत्रालय सोपवण्यात आलं होतं. अर्थात साबीर शेख हे फक्त मुस्लिम म्हणून नाही तर एक कट्टर शिवसैनिक म्हणून मंत्री झाले होते, असं त्यांचे कार्यकर्ते सांगतात.

साबीर शेख आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील घनिष्ठ संबंधांना त्यांची मुलगी आफ्रिन शेख आणि शिष्य विश्वास थोरात यांनी 'एनडीटीव्ही मराठी'शी बोलताना उजाळा दिला.

बाळासाहेबांनी दिली 'शिवभक्त' पदवी

पुणे जिल्ह्यातलं नारायणगाव हे साबीर शेख यांचं मुळ गाव. ते कामानिमित्त कल्याणमध्ये आले आणि तिथंच स्थायिक झाले. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं प्रेरित होऊन ते शिवसेनेत आले. ठाणे जिल्ह्यातल्या शहरी भागासह खेडोपाठी शिवसेना पोहचवण्याच त्यांचे मोलाचे योगदान होते. ज्ञानेश्वरीचे किर्तन, प्रवचन यामध्ये ते तल्लीन होत असतं. गड किल्ले सर करणे त्यांना फार आवड असे. हे सर्व पाहिल्यानंतर बाळासाहेबांनी साबीर भाईंना 'शिवभक्त' ही पदवी दिली, अशी माहिती थोरात यांनी दिली. 

बाळासाहेबांनी थांबवली सभा! साबीर शेख आणि बाळासाहेब यांच्यातील नातं कसं होतं, याबात फारशी कुणाला माहिती नसलेली आठवण थोरात यांनी यावेळी सांगितली. 'साबीर भाई आणि मी आरमाडा गाडीत बसून कल्याणमधून ठाण्यात होणाऱ्या बाळासाहेबांच्या सभेसाठी जायला निघालो. या मार्गावरील वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्ते यामुळे आम्हाला पोहोचायला उशीर झाला. पण, बाळासाहेबांनी तोपर्यंत सभा थांबवली होती. आम्ही पोहचोलो तसे साबीर भाई पळत बाळासाहेबांकडे गेले. बाळासाहेबांनी त्यांचे जंगी स्वागत केल्याचं मी पाहिलं. बाळासाहेब आणि साबीर भाई यांचं राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखं नातं होतं,' असं थोरात यांनी सांगितलं.

मीनाताईंनी केली होती विनंती

शिवसेना भाजपा युतीची 1995 साली पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी मनोहर जोशी आणि साबीर शेख या दोन नावांचा बाळासाहेब विचार करत होते. बाळासाहेब हातात कवड्याची माळ घेऊन घरात फेऱ्या मारत याबाबत विचार करत असताना मीनाताई ठाकरे बाहेर आल्या.'साबीरला मुख्यमंत्री करणे कठीण जात असेल तर साबीर यांना एक उच्च पद द्या असे बाळासाहेबांना म्हणाल्या.त्यानंतर बाळासाहेबांनी साबीर शेख यांना  कामगार मंत्री बनवले. त्यामुळे आमचा एक कामगार कामगार मंत्री झाला,' असं थोरात यांनी सांगितलं.संघटना बांधणीची सर्व महत्त्वाची कामं बाळासाहेब साबीर भाईंकडं सोपावत असत, ते आजारी असताना बाळासाहेब त्यांना जेजे हॉस्पिटलमध्ये भेटायलाही आले होते, असंही थोरात यांनी सांगितलं.

'तुमचा साबीर मंत्री झाला...'

बाबा कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर आम्ही सर्व कुटुंबीय बाळासाहेबांना भेटायला गेलो. त्यावेळी साहेबांनी बाबांना आशीर्वाद दिला. बाळासाहेबांनी माँ ना आवाज दिला. मीना बाहेर ये बघ तुझा साबीर आला आहे. आज तो मंत्री झालआहे,असे म्हणताच मीनाताई बाहेर आल्या आणि त्यांनी बाबांना ओवाळले.त्यावेळी मी केवळ 13-14 वर्षांची होते. ती आठवण कधीच विसरू शकत नाही, असं आफ्रिन शेख-चौगुले यांनी सांगितलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: