योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Akola News Today : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चान्नी गावात आज सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. छिंदवाडा येथील रहिवासी वसंत झाहा काही कामा निमित्त चान्नी–पांगरा मार्गाने जात असताना बसस्टँड परिसरात मोहाच्या झाडांवरील मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. क्षणातच काही शेकडो मधमाशा त्यांच्या अंगावर तुटून पडल्या. त्यानंतर ते खूप घाबरले आणि त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.परंतु, मधमाशांच्या तीव्र दंशामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि ते जय बजरंग विद्यालयाजवळ खाली पडले.या दरम्यान,जय बजरंग विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.
जखमी व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात नेलं, पण..
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक संग्राम इंगळे,शिक्षक एस.आर.गोपनारायण,शिपाई दयाराम शेगोकार तसेच अनिल इंगळे आणि भास्कर तायडे यांनी जीवाची पर्वा न करता जखमी वसंत झाहा यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. मधमाशांचा धोका असतानाही त्यांनी धैर्य दाखवत त्या व्यक्तीला मदत केली. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर त्यांनी जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात देण्याचा निर्णय घेतला.शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या या धाडसी कृतीमुळे मोठा अनर्थ टळला.
नक्की वाचा >> Akola News : एका भावाने दुसऱ्या भावावर केला चाकू हल्ला, नंतर घडली सर्वात भयंकर घटना, धक्कादायक कारण आलं समोर
अनिल इंगळे यांनी जखमी वसंत झाहा यांना चतारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेत पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून शिक्षकांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर विद्यार्थ्यांनीही आपल्या जीवाची खबरदारी म्हणून खिडक्या दरवाजे बंद करून घेतले होते. तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांनीही या शिक्षकांचे अभिनंदन करत मानवतेचे उत्तम उदाहरण घडवल्याची भावना व्यक्त केली आहे.