School Time: राज्यात जून महिन्याचा पंधरावडा उलटला तरी मान्सूनचे आगमन अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये एप्रिल-मे महिन्यासारखा तीव्र उकाडा, दमट हवामान आणि पाणीटंचाईचे संकट कायम आहे. अशा प्रतिकूल वातावरणात दुपारच्या सत्रात शाळा भरवल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा किमान पुढील 15 दिवस सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी 'ॲक्टिव्ह टीचर्स फोरम'चे राज्य संयोजक भाऊ चासकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
पत्रातील मुख्य मुद्दे
>> असह्य उकाडा आणि आरोग्य: मार्च-एप्रिल महिन्याप्रमाणेच जूनमध्येही उष्णतेची तीव्रता कायम आहे. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना या वातावरणात बसणे असह्य होत असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
>> पायाभूत सुविधांचा अभाव: अनेक शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये आजही लोखंडी पत्र्यांच्या वर्गखोल्या आहेत, ज्या उन्हामुळे प्रचंड तापतात. त्यातच अनेक ठिकाणी अपुरा वीजपुरवठा आणि लोडशेडिंगमुळे पंखे चालत नसल्याने वर्गात बसणे कठीण झाले आहे.
>> स्वच्छतागृहांचा प्रश्न: सर्वात गंभीर बाब म्हणजे डोंगरदऱ्यांतील वाड्या-वस्त्यांवरील शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या, विशेषतः विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न बिकट बनत आहे.
(नक्की वाचा- Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)
शिक्षण व्यवस्थेत लवचिकता दाखवण्याची गरज
दरवर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता पाहून शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय घेतला जातो. त्याच धर्तीवर सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीतही प्रशासनाने संवेदनशील निर्णय घेणे गरजेचे आहे, असे चासकर यांनी म्हटले आहे.
(नक्की वाचा- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरेंचे 6 खासदार 'नॉट रिचेबल', एकनाथ शिंदेंचं दिल्लीत 'ऑपरेशन टायगर'?)
विद्यार्थ्यांचे आरोग्य सर्वोच्च प्राथमिकता हवी
"शिक्षणाचा अधिकार आणि शैक्षणिक सातत्य महत्त्वाचे असले, तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य ही सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. शैक्षणिक दिवसांचे झालेले नुकसान पुढील काळात सुट्ट्या कमी करून किंवा इतर नियोजनाद्वारे भरून काढता येऊ शकते. त्यामुळे हवामानात सुधारणा होईपर्यंत शाळांचे वेळापत्रक बदलून ते सकाळचे करावे", अशी मागणी चासकर यांनी केली आहे.
शिक्षणमंत्री याबाबत आता काय निर्णय घेतात याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.