- ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत
- भिवंडीतील कामवारी नदी परिसरात एका तरुणाने वीजेच्या खांबावरून थेट नदीच्या प्रवाहात उडी घेतली
- त्या तरुणाचा स्टंट करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे
भूपेंद्र आंबवणे
सध्या ठाणे आणि पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदी नाल्यापासून दुर राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. शिवाय गरज नसेल तर घरा बाहेर पडू नका असे आवाहन ही करण्यात आले आहे. पण याचा काही लोकांवर परिणाम झालेला दिसत नाही. असचं म्हणायची वेळ आणणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ भिवंडीतला असल्याचं सांगितला जात आहे. यात एक तरुण जीव घेणा स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय अशा स्टंटबाजांना आधी आळा घाला अशी मागणी होत आहे.
भिवंडी शहरातील कामवारी नदी परिसरातील हा व्हिडीओ आहे. या नदीच्या काठावर वीजेचे खांब आहेत. त्या पैकी एका खांबावर एक तरुण चढला. त्यानंतर तो त्या खांबाच्या टोकावर पोहोचला. खाली कामवती नदी दुथडी वाहत होती. तिला पुर आला होता. आजूबाजूलाच्या घरातील लोक ही गोष्ट पाहात होते. त्याला खाली येण्यासाठी सांगत होते पण तो काही ऐकत नव्हता. त्यानंतर त्यांने त्या खांबावरून थेट नदीच्या प्रवाहात उडी घेतली. त्याच वेळी एका व्यक्तीने त्याचा व्हिडीओ तयार केला. तोच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही स्टंट जीव घेणा असाच म्हणावा लागेल. हा थरारक आणि तितकाच संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नदीच्या प्रवाहात उडी टाकल्यानंतर त्या युकवाचे काय झाले ही माहिती मात्र समोर आलेली नाही. त्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे अधिका माहिती उपलब्ध होवू शकली नाही. मात्र मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीत विविध दुर्घटना घडल्या आहेत. आतापर्यंत तीन युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे, तर अन्य दोघांचा शोध अजून ही सुरू आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि संबंधित यंत्रणा बेपत्ता युवकांचा शोध घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
अशा गंभीर परिस्थितीतही काही युवकांकडून जीव धोक्यात घालून स्टंटबाजी केली जात असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. याबाबत प्रशासनाने नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, पालकांनी आपल्या मुलांना नदी, नाले आणि पाण्याने भरलेल्या धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखावे. पावसाळ्यात अशा प्रकारचे स्टंट जीवावर बेतू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असं सांगण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर ही जर कोणी असे स्टंट करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.