फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला जमिनीवर बसवले; भिवंडीतील शाळेतील संतापजनक प्रकार

शाळा प्रशासनाच्या या अपमानास्पद आणि अमानुष वर्तनामुळे विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

भुपेंद्र अंबावणे, भिवंडी

भिवंडी शहरात मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शहरातील प्रसिद्ध सलाहुद्दीन आयुबी मेमोरियल इंग्लिश अँड उर्दू स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेची फी न भरल्यामुळे दहावीच्या एका विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे जमिनीवर बसण्यात आले. इतकेच नाही, तर विद्यार्थ्याला परीक्षेसाठीही जमिनीवर बसण्यास भाग पाडण्यात आले, असा विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप आहे.

(नक्की वाचा- Pune News: कोंढव्यात रात्रभर ATS चे सर्च ऑपरेशन; काही संशयित ताब्यात)

संतप्त पालकांनी केली पोलिसांत तक्रार

शाळा प्रशासनाच्या या अपमानास्पद आणि अमानुष वर्तनामुळे विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कुटुंबीयांनी थेट शांती नगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि शाळा प्रशासनाविरुद्ध तक्रार दाखल केली. अपमानास्पद वागणुकीमुळे मुलाला नैराश्याचा सामना करावा लागला आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी शाळा व्यवस्थापनाच्या या अमानुष वृत्तीचा तीव्र निषेध केला आहे. 'फी न भरणे म्हणजे मुलाचा अपमान करणे आहे का? हे शिक्षणाचे मंदिर आहे की अपमान करण्याचे ठिकाण?' असे प्रश्न लोक उपस्थित करत आहेत.

या घटनेवर शाळा प्रशासनाचे आणि मुख्याध्यापकांचे मत जाणून घेण्यासाठी जेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना प्रथम तासन्तास वाट पाहावी लागली. त्यानंतर मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाचे फोन बंद केले. या वृत्तीमुळे शाळा व्यवस्थापनाची असंवेदनशीलता आणखी उघड झाली आहे.

Advertisement

(नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार)

सध्या पोलिसांनी मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. शुल्काच्या नावाखाली निष्पाप मुलांच्या प्रतिष्ठेशी तडजोड करणाऱ्या अशा शाळांविरुद्ध कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात कोणतीही शैक्षणिक संस्था असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Topics mentioned in this article