डोंबिवली MIDC मधील कंपनीत स्फोट झाल्याची माहिती आहे. MIDC फेज 2 मधील कंपनीत स्फोट झालाय. अमुदान कंपनीत दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी हा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की परिसरातील इमारतीच्या काचा देखील फुटल्या. स्फोटाचे दोन ते तीन आवाज ऐकू आले, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे. या स्फोटात किती जीवितहानी झाली हे समजलेलं नाही. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 64 जण जखमी झाले आहेत.
या स्फोटानंतर धुराचे मोठे लोट परिसरात दिसत आहेत. त्यावरुन ही आग मोठी असल्याचा अंदाज आहे. अग्निशमनदलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. घटनास्थळी तातडीनं बचाव कार्य हाती घेण्यात आलंय. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या स्फोटानंतर आजूबाजूच्या काही कंपन्यांना देखील आग लागल्याचं समजतंय. या परिसरातील वाहनांचं देखील स्फोटात मोठं नुकसान झालंय.
डोंबिवलीच्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी वस्ती आहे. या स्फोटानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. डोंबिवली MIDC मधील कंपन्यांच्या सुरक्षेबाबत यापूर्वी देखील वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, याकडं या नागरिकांनी लक्ष वेधलं.