Mumbai Beach Cleanup Drive: मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक राखण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे 9 जुलै 2026 ते 19 जुलै 2026 या कालावधीत विशेष समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विशेष म्हणजे 14 जुलै ते 18 जुलै 2026 या कालावधीत समुद्राला 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटांसह मोठी भरती येणार असल्याने समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून येण्याची शक्यता लक्षात घेऊन या विशेष स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले. या विशेष मोहिमेदरम्यान भरती-ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेला प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती तसेच इतर विविध प्रकारचा कचरा असे एकूण 2 हजार 498.66 मेट्रिक टन घनकचऱ्याचे संकलन करण्यात आले. संकलित करण्यात आलेल्या या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
समुद्रकिनारा विशेष स्वच्छता मोहीम
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली समुद्रकिनारा विशेष स्वच्छता मोहीम अत्यंत नियोजनबद्ध, समन्वयपूर्ण आणि प्रभावीपणे राबवण्यात आली. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधण्यात आला. स्वच्छता कामांचे नियमित नियोजन, देखरेख आणि आवश्यक त्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. विशेषतः मान्सून काळात भरती-ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात वाहून येणारा कचरा तत्काळ हटवण्यासाठी यंत्रसामग्री, वाहने आणि आवश्यक मनुष्यबळाची प्रभावी उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. या व्यापक स्वच्छता उपक्रमामुळे नागरिक आणि पर्यटकांना स्वच्छ, आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण उपलब्ध झाले आहे.
(नक्की वाचा: Water cut: मुंबईकरांवर वर्षभर पाणी कपातीच संकट? पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांत किती दिवस पुरेल ऐवढा पाणीसाठा?)
कोणकोणत्या ठिकाणाहून किती कचरा केला गोळा?
उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी चौपाटीवरील कचरा संकलनाबाबत सांगितले की, 9 जुलै ते दिनांक 19 जुलै 2026 या कालावधीत 1.1 किलोमीटर लांबीच्या गिरगाव चौपाटी (डी विभाग) येथून 33.66 मेट्रिक टन, 5 किलोमीटर लांबीच्या दादर - माहीम समुद्रकिनारा (जी उत्तर विभाग) येथून 152.10 मेट्रिक टन, 3.5 किलोमीटर लांबीच्या चिंबई - वारिंगपाडा समुद्रकिनारा (एच पश्चिम विभाग) येथून 127.20 मेट्रिक टन, 8 किलोमीटर लांबीच्या मढ - मार्वे समुद्रकिनारा (पी उत्तर विभाग) येथून 44.28 मेट्रिक टन, 6 किलोमीटर लांबीच्या जुहू समुद्रकिनारा (के पश्चिम विभाग) येथून 1,825 मेट्रिक टन, 4.5 किलोमीटर लांबीच्या वेसावे समुद्रकिनारा येथून 277.60 मेट्रिक टन तसेच सरासरी 7 किलोमीटर लांबीच्या गोराई समुद्रकिनारा (आर मध्य विभाग) येथून 38.82 मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. या विशेष स्वच्छता मोहिमेत एकूण 2 हजार 498.66 मेट्रिक टन कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
विशेष स्वच्छता पथके नियुक्त
या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन खात्यामार्फत कळवण्यात आले आहे की, मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक राहावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत आहे. विशेषतः मान्सून काळात भरती - ओहोटीमुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती तसेच इतर विविध प्रकारचा कचरा समुद्रकिनाऱ्यावर वाहून येत असल्याने तो तातडीने हटवण्यासाठी विशेष स्वच्छता पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके नियमितपणे समुद्रकिनाऱ्यांची पाहणी करून कचऱ्याचे संकलन आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे कार्य करत आहेत. समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेकामी नागरिकांचाही सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांनी समुद्रकिनारे स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे.