
मुंबई महानगरात सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे सुरू आहे. 31 मे 2025 पूर्वी काँक्रिटीकरण कामे पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी मायक्रो प्लानिंगकरणे, रस्तानिहाय काम पूर्णत्वाची तारीख निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासोबत, सध्या सुरू असणारी काँक्रिटीकरण कामे अर्धवट न करता रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पूर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कामाचा आवाका आणि मर्यादित कालावधी यांची सांगड घालून देखील संपूर्ण रस्ता काँक्रिटीकरण काम पूर्णत्वास जाणार नसेल तर, रस्त्यातील चौक ते चौक काम पूर्ण करावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेली रस्ते काँक्रिटीकरण कामे मध्यावस्थेत आहेत. या अंतर्गत मालाड पश्चिम काचपाडा येथील रामचंद्र मार्ग, कांदिवली पश्चिम येथील पारेख गल्ली, महावीर नगर मार्ग काँक्रिटीकरण कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या नियोजित दौऱ्यादरम्यान बांगर यांनी मालाड पश्चिम येथील दादीसेठ मार्ग, मालाड शॉपिंग सेंटर जवळील मार्ग आणि बालाजी हॉटेल समोरील काँक्रिटीकरण कामांची देखील आकस्मिक पाहणी केली.
मालाड पश्चिम येथील दादीसेठ मार्गावर काँक्रिटीकरण कामाबरोबरच मलनि:सारण प्रचालन विभागाचे कामकाज सुरू आहे. या ठिकाणी हमरस्त्यावर खोदकाम करत केवळ एकाच बाजूने बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तर उर्वरित बाजूने चेंबर धोकादायक पद्धतीने खुले असल्याची बाब निदर्शनास आली. या प्रकरणाची दखल घेत संबंधित अभियंत्यास नोटीस देण्यात आली आहे. शिवाय सक्त कारवाई करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले आहेत. बांगर यांच्या आदेशानुसार, चेंबरला तातडीने चहुबाजूने बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
मालाड शॉपिंग सेंटर जवळील मार्ग आणि बालाजी हॉटेल समोरील काँक्रिटीकरण कामांची आकस्मिक पाहणी करताना बांगर यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविली आहेत. एका बाजूचे काँक्रिटीकरण काम करताना दुसऱ्या बाजूच्या रस्त्याची पातळी समतल असावी, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहिल. विशेषत: दुचाकींसाठी वाहतुक योग्य रस्ता असावा, याची दक्षता बाळगावी. उपयोगिता वाहिन्यांचे स्थलांतरण करताना खबरदारी घ्यावी, असे निर्देश ही त्यांनी दिले. काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी करताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. रस्तेकामादरम्यान, वाहतुकीचे योग्य नियमन करण्यासाठी सुयोग्यपणे रस्तारोधक लावण्याची जबाबदारी कंत्राटदारांची असली तरी त्यावर रस्ते विभागाच्या अभियंत्याचे नियंत्रण हवे,असेदेखील बांगर यांनी नमूद केले.
दरम्यान ज्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, त्या रस्त्यांना थर्मोप्लास्ट, झेब्रा क्रॉसिंग, कॅट आईज, चौकांमध्ये पिवळ्या थर्मोप्लास्ट रंगाचे ग्रीड बसविणे इत्यादी कामे पूर्ण करावीत, जेणेकरुन त्या रस्त्यांची उपयुक्तता खऱ्या अर्थाने साध्य होईल, तसेच परिसराच्या सौंदर्यात भर पडेल. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) चे सहायक प्रा. सोलोमन डिब्बार्ती, महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) श्री. गिरीश निकम, उप प्रमुख अभियंता (पूर्व उपनगरे) श्री. संजय बोरसे यांच्यासह गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.