Kurla to Ghatkopar Traffic Jam : कुर्ला ते घाटकोपर पश्चिमेतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या मार्गावर 4.2 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याचं प्लानिंग मुंबई महानगरपालिकेकडून केलं जात आहे. कुर्ला आणि घाटकोपरला जोडणाऱ्या एलबीएस मार्गावर नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र लवकरच प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कुर्ल्यातील कल्पना टॉकिज ते एलबीएस मार्ग घाटकोपरच्या सर्वोदय रुग्णालयापर्यंत 4.2 किमी लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिका लवकरच या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू करणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. हा भाग नौदलाचा असल्या कारणाने एनओसी मिळण्यात अडचणी येत होत्या. याबाबत नौदल आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये अनेकदा बैठकी झाल्या. यानंतर उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा झाला. कुर्ला ते घाटकोपरला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल. या उड्डाणपुलामुळे कुर्ला, घाटकोपरसह पुढील मार्गावरही वाहतूक कोंडीतून सुटका होईल.
सध्या या रस्त्याची परिस्थिती काय आहे?
एलबीएस रोडची सायनपासून सुरूवात होते. पुढेल एलबीएस मार्ग कुर्ला, घाटकोपरने जात मुलुंडला जोडला जातो. यादरम्यान दुसरा मार्ग फिनिक्स मार्केटसिटी मॉलहून साकीनाका मार्गाने अंधेरीलाही जोडतो. कुर्ल्याच्या कल्पना टॉकिजपासून वाहतूक कोंडीला सुरुवात होते. याकारणास्तव घाटकोपर, जरीमरी आणि अंधेरीपर्यंत प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिकेने कल्पना टॉकीजपासून घाटकोपरच्या सर्वोदय रुग्णालयापर्यंत साधारण 4.2 किलोमीटर लांब उड्डाणपूल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
उड्डाणपुलाची आवश्यकता का आहे?
कुर्ला, घाटकोपर, अंधेरी आणि मुलुंड या पट्ट्यात मोठी वाहतूक कोंडी असते. येथे रस्तेशेजारी अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम आणि गाड्यांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. बरचं विचारमंथन आणि सर्वेक्षण केल्यानंतर पालिकेने कुर्लाच्या कल्पना टॉकिजपासून घाटकोपरच्या सर्वोदय रुग्णालयापर्यंत उड्डाणपूल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गाड्याना घाटकोपरला जायचं आहे, ते सरळ उड्डाणपुलावरुन जाऊ शकतील. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल आणि कोंडीतून दिलासा मिळेल.