- संजय गांधी नॅशनल पार्कमधील वनराणी मिनी ट्रेन नवीन तंत्रज्ञानासह पर्यटकांसाठी दिमाखात पुनरागमन
- केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या पर्यावरणपूरक बॅटरीवर चालणाऱ्या ट्रेनचे उद्घाटन
- मुंबईकरांची लाडकी वनराणी पुन्हा सेवेत दाखल
Borivali National Park | Vanrani Mini Train: बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये (SGNP) पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘वनराणी' मिनी ट्रेनचे शनिवारी (14 मार्च) दिमाखात पुनरागमन झाले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. अनेक वर्षांपासून मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेली ही ट्रेन आता नव्या रूपात आणि अधिक आधुनिक तंत्रज्ञानासह पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.
सफारीची मजा आता द्विगुणीत | Borivali National Park | Vanrani Mini Train New Look
पियुष गोयल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं की, "महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 'वनराणी मिनी ट्रेन'चे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. नवीन ऊर्जा-कार्यक्षम, पर्यावरणपूरक बॅटरीवर आधारित असणारे इंजिन, आधुनिक कोच आणि संपूर्ण मार्गावर सौंदर्यीकरणासह असलेला हा उपक्रम पर्यटन तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला एक नवीन चालना देईल. निसर्ग संवर्धनासह विकास हा आमचा उत्तर मुंबईच्या प्रगतीचा संकल्प आहे."
पर्यटकांसाठी खास योजना
तर वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, "वनराणी या मिनी ट्रेनमुळे संजय गांधी नॅशनल पार्कचे वैभव पुन्हा एकदा परत आले आहे. व्हिस्टाडोम मिनी ट्रेन आणि वनराणी विंटेज ट्रेन अशा दोन ट्रेन याठिकाणी धावणार आहेत. या ट्रेन बॅटरीवर चालणाऱ्या असल्यामुळे पर्यावरणपूरक आहेत. निसर्गरम्य वातावरण, वन्यजीवांची समृद्ध जैवविविधता अनुभवण्याची अनोखी संधी या मिनी ट्रेनच्या माध्यमातून पर्यटकांना मिळणार आहे".
(नक्की वाचा: FASTag Annual Pass: 3000 रुपये विसरा, राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणं आणखी महागणार; टोल पासची नवी किमत जाणून घ्या)
(नक्की वाचा: Mumbai News: खूशखबर! वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रोची घोषणा, कसा असेल नवा मार्ग? प्रकल्पाचा खर्च किती? वाचा)मुंबईकरांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा
पर्यावरण संवर्धन, पर्यटनाला चालना आणि उद्यानातील समृद्ध वनसंपदेची ओळख करून देण्याच्या दृष्टीने वनराणी मिनी ट्रेन पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षण ठरणार आहे. या मिनी ट्रेनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, पर्यटक आणि निसर्गप्रेमींना उद्यानातील वनसंपदेची अधिक जवळून ओळख करून घेता येईल. वनराणी पुन्हा सुरू झाल्यामुळे मुंबईकरांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला असून पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Photo Credit: NDTV Marathi