Buldhana News: गरीब विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवल्या जातात. मात्र, या योजना दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत कशा पोहोचतात, याचे एक जिवंत आणि अत्यंत संतापजनक उदाहरण बुलढाणा जिल्ह्यात उघड झाले आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आदिवासीबहुल बावनबीर येथे असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बावनबीर येथे विद्यार्थ्यांना चक्क रद्दीच्या कागदावर जेवण दिले जात असल्याचा *लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे.
जिल्हा परिषदेच्या या शाळेत 'प्रधानमंत्री निर्मल पोषण आहार' योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना खिचडी जेवण दिले जाते. परंतु, या जेवणाचे वितरण करण्याची पद्धत पाहून स्वच्छतेचे आणि आरोग्याचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे दिसून आले होते.
विद्यार्थ्यांना रद्दीच्या कागदांवर जेवण दिले जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी स्टील प्लेट्स उपलब्ध करून देण्याचे सक्त निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत. तसेच, ज्या ठिकाणी विद्यार्थी जेवण करतात, त्या ठिकाणी स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
विद्यार्थांचं आरोग्य धोक्यात
बावनबीर येथील शाळेत जेवण देण्याची पद्धत आणि परिसरातील अवस्था यावरून जीवघेणा खेळ सुरू असल्याचे स्पष्ट होते. विद्यार्थी ज्या ठिकाणी जेवण करत आहेत, तिथे मोकाट श्वान फिरताना दिसत आहेत. यावरून स्वच्छतेचे तीन तेरा कसे वाजले आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही विद्यार्थ्यांना रद्दीच्या कागदावर जेवण देणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. या कागदांवर असलेले जीवाणू आणि अस्वच्छता विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करू शकते.
(नक्की वाचा- Dombivli News: डोंबिवलीकरांसाठी 'गूड न्यूज'! स्थानकातच उभारणार शॉपिंग मॉल आणि मल्टिप्लेक्स, काय मास्टर प्लॅन?)
नागरिकांची नाराजी
या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि पालकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतात, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ तातडीने थांबायला हवा, असं नागरिकांचा मत आहे.