जाहिरात

'ड्रेस कोड' ते 'एन्ट्री टाईम'; CBSE बोर्डाच्या परीक्षेला जाण्यापूर्वी पाहा शेवटच्या मिनिटाचे महत्त्वाचे नियम

CBSE Board Exams 2026 : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन म्हणजेच CBSE बोर्डाच्या परीक्षेच्या नियमावलीत काही मोठे बदल करण्यात आले आहेत.

'ड्रेस कोड' ते 'एन्ट्री टाईम'; CBSE बोर्डाच्या परीक्षेला जाण्यापूर्वी पाहा शेवटच्या मिनिटाचे महत्त्वाचे नियम
CBSE Board Exams 2026: च CBSE बोर्डाच्या परीक्षांना उद्यापासून (मंगळवार, 17 फेब्रुवारी)  सुरुवात होत आहे.
मुंबई:

CBSE Board Exams 2026 : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन म्हणजेच CBSE बोर्डाच्या परीक्षांना उद्यापासून (मंगळवार, 17 फेब्रुवारी)  सुरुवात होत आहे. 10 वी आणि 12 वीच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा काळ असून बोर्डाने परीक्षेच्या नियमावलीत काही मोठे बदल केले आहेत. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी धावपळ होऊ नये आणि कोणत्याही तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी हे नियम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

परीक्षेला जाताना ड्रेस कोड आणि ओळखपत्राचे नियम

बोर्डाच्या नियमानुसार, सर्व नियमित विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या अधिकृत गणवेशातच (School Uniform) परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. गणवेशाशिवाय येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाऊ शकतो. तसेच, विद्यार्थ्यांनी सोबत आपले मूळ प्रवेशपत्र (Admit Card) आणि शाळेचे ओळखपत्र (School ID) बाळगणे आवश्यक आहे. या दोन कागदपत्रांशिवाय परीक्षा केंद्रात एन्ट्री मिळणार नाही.

( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांनो सुटका झाली, हिंजवडी मेट्रो धावली! 23 किलोमीटर प्रवासातील सर्व स्टेशन्स कोणती? पहा VIDEO )

वेळेचे नियोजन आणि प्रवेशाची मर्यादा

विद्यार्थ्यांनी वेळेचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सकाळी 10:00 वाजेनंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे ट्रॅफिक आणि इतर अडचणींचा विचार करून विद्यार्थ्यांनी केंद्रावर किमान अर्धा तास आधी पोहोचणे हिताचे ठरेल. 

परीक्षा हॉलमध्ये सोबत काय नेऊ शकता, याचेही नियम स्पष्ट आहेत. विद्यार्थ्यांना फक्त निळा किंवा रॉयल ब्लू बॉलपॉइंट पेन, पारदर्शक पाऊचमधील भूमिती साधने (Geometry Box) आणि पाण्याची पारदर्शक बाटली सोबत नेण्याची परवानगी असेल.

( नक्की वाचा : Pune News: चेक विसरा, आता थेट बँक खात्यात पडणार करोडो रुपये; पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! वाचा अपडेट )

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि उत्तीर्ण होण्याचे निकष

यावर्षी प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात मोठा बदल करण्यात आला आहे. 10 वी आणि 12 वीच्या दोन्ही पेपरमध्ये आता 50% प्रश्न हे 'कॉम्पिटेंसी बेस्ड' म्हणजेच क्षमतेवर आधारित असतील. 

उर्वरित प्रश्नांमध्ये 20% बहुपर्यायी (MCQ) आणि 30% पारंपारिक लघु किंवा दीर्घोत्तरी प्रश्न असतील. उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 33% मार्क्स मिळवणे आवश्यक आहे. ज्या विषयांना प्रॅक्टिकल परीक्षा आहे, तिथे थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीमध्ये स्वतंत्रपणे 33% मार्क्स मिळवणे अनिवार्य आहे.

पेपर लिहिताना घ्यायची विशेष काळजी

10 वीच्या विज्ञान (Science) आणि समाजशास्त्र (Social Science) विषयाच्या पेपरसाठी बोर्डाने नवीन सूचना दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक सेक्शनचे उत्तर त्याच सेक्शनसाठी दिलेल्या जागेत किंवा क्रमाने लिहावे. 

उदाहरणार्थ, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची उत्तरे त्यांच्या संबंधित सेक्शनमध्येच असणे आवश्यक आहे. चुकीच्या सेक्शनमध्ये लिहिलेली उत्तरे तपासली जाणार नाहीत, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच 12 वीच्या उत्तरपत्रिकांसाठी या वर्षापासून ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) सुविधा लागू करण्यात आली आहे.

सोशल मीडिया आणि शिस्तभंगाची कारवाई

परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारची गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. एखादा विद्यार्थी सोशल मीडियावर परीक्षेबाबत खोटी माहिती किंवा अफवा पसरवताना आढळला, तर त्याच्यावर अनफेयर मीन्स (UFM) अंतर्गत कारवाई केली जाईल. अशा विद्यार्थ्याचा पेपर रद्द होऊ शकतो आणि त्याच्यावर CBSE परीक्षा देण्यापासून 5 वर्षांची बंदी देखील घातली जाऊ शकते.

दोन टप्प्यात परीक्षा देण्याची संधी

10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी दोन एक्झाम विंडो उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिला टप्पा (Phase 1) जो सध्या फेबुवारीमध्ये सुरू होत आहे आणि दुसरा टप्पा (Phase 2) जो मे महिन्यात होईल. 

जे विद्यार्थी आपला स्कोअर सुधारू इच्छितात किंवा जास्तीत जास्त 3 विषयात नापास झाले आहेत, त्यांना मे महिन्यातील परीक्षेत बसण्याची संधी मिळेल. दोन्ही टप्प्यांपैकी ज्या परीक्षेत जास्त गुण असतील, तेच अंतिम निकालासाठी ग्राह्य धरले जातील.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com