केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा अनुभव अधिक प्रभावी बनवण्यासाठी एक मोठा बदल करत आहे. आता विद्यार्थ्यांना परीक्षा देताना पुस्तके समोर ठेवण्याची परवानगी मिळणार आहे. या 'ओपन बुक एक्झाम' (Open Book Exam) पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची पाठांतरावरची भिस्त कमी होऊन संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
'ओपन बुक एक्झाम' म्हणजे काय?
या नवीन पद्धतीनुसार, विद्यार्थ्यांना परीक्षेत त्यांच्या पाठ्यपुस्तके, नोट्स आणि इतर संदर्भ साहित्य सोबत ठेवण्याची परवानगी असेल. पण याचा अर्थ असा नाही की, ते केवळ पुस्तकातून पाहून उत्तरे देऊ शकतील. या परीक्षेत प्रश्न अशा प्रकारे तयार केले जातील की, विद्यार्थ्यांना केवळ पाठांतर करून नव्हे, तर त्यांच्या संकल्पनांच्या सखोल आकलनावर आधारित विश्लेषण करावे लागेल आणि योग्य उत्तर शोधावे लागेल. यामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता विकसित होईल, अशी अपेक्षा आहे.
(नक्की वाचा - Walking For Health : दररोज किती पावलं चालल्याने हार्टअटॅक येणार नाही?)
CBSE बोर्डाने या नवीन पद्धतीचा एक 'पायलट अभ्यास' डिसेंबर 2024 मध्ये घेतला होता. यामध्ये 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक असेसमेंट आयोजित करण्यात आले होते. या अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सकारात्मक होता, असे दिसून आले. विद्यार्थ्यांनी सांगितले की, या पद्धतीमुळे त्यांना पाठांतराचा भार कमी झाला आणि विषयाची सखोल समज विकसित झाली. शिक्षक आणि पालकांनीही या पद्धतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
(नक्की वाचा- Interesting facts : बाटलीच्या झाकणाच्या रंगामागे लपलेलं असतं मोठं रहस्य, 99% लोकांना हे माहीत नाही!)
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केवळ पाठांतरावर आधारित न राहता, त्यांच्या संकल्पनांच्या आकलनावर आधारित होईल, अशी CBSEची अपेक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक अर्थपूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.