Pune News: पुणे जिल्ह्यातल्या चाकण औद्योगिक परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या दयनीय अवस्थेवर प्रशासनाने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी रस्ते दुरुस्ती, अतिक्रमणे आणि वाहतूक नियोजनाबाबत संबंधित यंत्रणांना कडक इशारे दिले आहेत. 31 ऑगस्टपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजवून तातडीची कामे पूर्ण करा, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
24 तास वाहतूक वळवून कामे पूर्ण करण्याचे आदेश
रस्त्यांची दुरुस्ती सुरू असताना त्याच मार्गावरून सातत्याने वाहने जात राहिल्यास कामाचा वेग आणि गुणवत्ता दोन्ही खालावते, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे कामाचे स्वरूप पाहून आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गाने वाहतूक वळवावी आणि 24 तास काम करून रस्ते तातडीने पूर्ण करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
पीएमआरडीए आणि इतर प्रशासकीय विभागांनी आपसात योग्य समन्वय ठेवून ही कामे पूर्ण करावीत, जेणेकरून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल.
अतिक्रमण हटवून त्वरित पायाभूत सुविधा उभारा
चाकणमधील भयानक वाहतूक कोंडीमागे मुख्य रस्ते आणि साईडपट्ट्यांवर झालेली अतिक्रमणे हे मोठे कारण आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे प्राधान्याने हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, एकदा हटवलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी त्या ठिकाणी लगेचच रस्ता, ड्रेनेज किंवा इतर पायाभूत सुविधा उभारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच नैसर्गिक नाले व ड्रेनेजची अपूर्ण कामे एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे.
पार्किंगची अडचण सोडवण्यासाठी विशेष नकाशा
औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहने आणि पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी उपलब्ध पार्किंगच्या जागांचा एक स्पष्ट नकाशा तयार केला जाणार आहे. हा नकाशा स्थानिक उद्योग, चालक आणि ट्रान्सपोर्टर्सना उपलब्ध करून दिला जाईल. तसेच ट्रान्सपोर्ट असोसिएशनसोबत स्वतंत्र बैठक घेऊन रिक्षा व मालवाहू वाहनांच्या हालचालींचा अभ्यास वाहतूक आराखड्यात समाविष्ट केला जाणार आहे.
चाकणचा सर्वंकष सर्वेक्षण आणि एकात्मिक आराखडा
भविष्यात एकदा तयार केलेला रस्ता वारंवार खोदावा लागू नये, यासाठी चाकण परिसरातील सर्व रस्ते, ड्रेनेज आणि पार्किंग व्यवस्थेचे सर्वंकष सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेक्षणातील त्रुटी दूर करून एक एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमदार बाबाजी काळे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींवरही तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.