कलकत्ता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये 9 ऑगस्टच्या मध्यरात्री डॉक्टर तरुणीवर अत्याचार करुन हत्या झाली. या क्रूर घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान आज राखीपौर्णिमेला एका तरुणीने समस्त महिला वर्गासाठी एक संदेश पाठवला आहे. संदेश लिहिलेला फलक घेऊन ती रस्त्यात उभी होती. ही घटना चंद्रपुरातून समोर आली आहे.
चंद्रपूरतील एका महिला डॉक्टरने कलकत्ता येथील घटनेचा निषेध नोंदवितानाच केवळ राखीच्या भरवशावर राहू नका, स्वताची सुरक्षा स्वतः करा अशा शुभेच्छा दिल्या आहेत. संदेश फलक हातात घेऊन मुख्य मार्गाच्या मध्यभागी उभ्या झालेल्या या महिला डॉक्टरने शहरवासियांचे लक्ष वेधले आहे. हिना झाडे असे या डॉक्टर महिलेचे नाव असून कोरपणा तालुक्यातील गडचांदूर शहरात हिचा खाजगी दवाखाना आहे.
नक्की वाचा - लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक लांबणीवर? विधानसभा निवडणुका कधी होणार?
आज रक्षाबंधनाच्या सण. आपल्या लाडक्या भावाला ओवाळणी करण्यात बहीण व्यस्त असताना चंद्रपूर जिल्हातील गडचांदुर येथील डॉक्टर बहीण मात्र अत्याचाराची बळी ठरलेल्या आपल्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी संदेश फलक हातात घेऊन मुख्य मार्गावर उभी होती.
रक्षाबंधन हा भाऊ बहिणीसाठी पवित्र सण. संकटात सापडलेल्या बहिणीची रक्षा करायला भाऊ धावून येईल अशी प्रत्येक बहिणीला आशा असते. मात्र या डॉक्टर महिलेने केवळ राखीच्या भरोशावर राहू नका, स्वतःची सुरक्षा स्वतः करा असा संदेश दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे. या घटना संताप वाढविणाऱ्या आहेत. अशा वेळी महिलांनी स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी स्वत:च्याच हातात घेण्याची गरज निर्माण झाली असून या डॉक्टर ताईने हाच संदेश दिला आहे.