Chandrapur: चंद्रपुरात खळबळ! खुंटीवरची पँट घातली अन् अंग थंड पडलं, 12 वर्षाच्या मुलाची 3 दिवस मृत्यूशी झुंज

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे खुंटीवर टांगलेल्या पँटमध्ये लपलेल्या या जीवामुळे 12 वर्षांच्या मुलाला थेट मृत्यूच्या दारात पोहोचवले होते. वाचा नेमके काय घडले होते.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Chandrapur News: पँट घातली अन् 12 वर्षांच्या मुलाची प्रकृतीच खालावली"
प्रतिकात्मक फोटो Canva

- अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी

Chandrapur News: घरात खुंटीवर टांगलेली पँट घातल्याने एका 12 वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर झाल्याची घटना घडलीय. कारण पँटमध्ये शिरलेल्या विंचूने दंश केल्यामुळे या मुलाची तब्येत प्रचंड खालावली. घरगुती उपचारांमुळे विषाचा प्रभाव वाढल्याने मुलाचे बीपी (रक्तदाब) मोजता येत नव्हते, तर शरीरातील ऑक्सिजन पातळी अवघ्या 46 टक्क्यांवर पोहोचली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पण डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांमुळे या मुलाला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. अनुप ईश्वर ढोणे (वय 12) असे जीवदान मिळालेल्या मुलाचे नाव आहे.

नेमकी घटना काय घडली?

विहीरगाव येथील रहिवासी असलेला अनुप ढोणे याने आंघोळीला जाण्यापूर्वी आपली पँट घरातील खुंटीवर टांगली होती. आंघोळ आटोपून आल्यानंतर त्याने तीच पँट अंगात चढवली. पण पँटमध्ये विंचू शिरला होता. पँट घालताच विंचूने अनुपला दंश केला. तीव्र वेदनांमुळे अनुप मोठ्याने ओरडल्याने कुटुंबीयांनी धाव घेतली. पँटची तपासणी केली असता त्यात विंचू आढळून आला.

Advertisement

घरगुती उपचारांमुळे प्रकृती गंभीर

विंचू चावल्यानंतर कुटुंबीयांनी सुरुवातीला डॉक्टरांकडे न जाता घरगुती उपचार केले. पण यामुळे विषाचा प्रभाव कमी होण्याऐवजी वाढतच गेला. दुसऱ्याच दिवशी अनुपची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. त्याला तातडीने स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, पण  तिथल्या डॉक्टरांनी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे सांगत त्याला तत्काळ चंद्रपूरला हलवण्याचा सल्ला दिला.

ऑक्सिजन 46 टक्क्यांवर, हृदय जोरात धडधडत होतं

अनुपला गंभीर अवस्थेत चंद्रपूर येथील बेंदले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्याची प्रकृती पाहून डॉक्टरही चक्रावले. तपासणी दरम्यान अनुपचा रक्तदाब (BP) पूर्णपणे घसरला होता, तो मोजताही येत नव्हता. त्याचे शरीर बर्फासारखे थंड पडले होते. फुफ्फुसातील ऑक्सिजनचे प्रमाण केवळ 46 टक्क्यांवर आले होते, तर हृदयाचे ठोके प्रति मिनिट 150 ते 160 इतक्या भयानक वेगाने धावत होते.

(नक्की वाचा: Mumbai Rain: मुंबईला पावसाचा रेड अलर्ट! सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी, खासगी कंपन्यांचं काय?)

डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून दिले जीवदान

रुग्णालयाचे संचालक डॉ. बेंदले यांनी वेळ न घालवता अतिदक्षता विभागात (ICU) अनुपवर उपचार सुरू केले. सलग तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अनुपच्या प्रकृतीत चमत्कारिक सुधारणा झाली. सध्या अनुप पूर्णपणे धोक्याबाहेर असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

(नक्की वाचा: Mumbai Heavy Rain Reason: पुढील काही दिवस धोक्याचे! एवढा पाऊस का पडतोय? मुंबईसह राज्यातल्या धुवांधार पावसाचे 'हे' आहे कारण)

Advertisement

डॉक्टरांचे महत्त्वाचे आवाहन: घरगुती उपचार नकोच!

या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. बेंदले यांनी नागरिकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. विंचू, साप किंवा कोणताही विषारी कीटक चावल्यास घरगुती किंवा गावरान उपचारांमध्ये वेळ वाया घालवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. सुरुवातीला लक्षणे सामान्य वाटली तरीही 24 तासांच्या आत या विषाचा थेट परिणाम हृदय आणि फुफ्फुसांवर होतो, जो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे अशा रुग्णांना पहिल्या काही तासांतच तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेणे अत्यंत गरजेचे आहे.