NDTV मराठीच्या वृत्तानंतर सह्याद्री रुग्णालयाच्या कथित संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी आता अधिक तीव्र झाली आहे. याआधी समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय म्हणून नोंदणीकृत असून, नियमानुसार कोणत्याही रचनात्मक किंवा शेअर होल्डिंगमधील बदलांची माहिती धर्मादाय आयुक्त कार्यालयाला देणे बंधनकारक आहे. मात्र, अशा कोणत्याही बदलाची माहिती कार्यालयाकडे आलेली नाही असे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून कळाले आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती NDTV मराठीला दिली आहे.
( नक्की वाचा: सह्याद्री हॉस्पिटल उभारणाऱ्या चारुदत्त आपटेंची खळबळजनक ऑडियो क्लिप )
या प्रकरणी झालेल्या गंभीर आरोपांमुळे त्याची दखल घेत धर्मादाय आयुक्तांनी एका निरीक्षकाची नियुक्ती करत चौकशी सुरू केली आहे. केवळ धर्मादाय आयुक्त कार्यालयच नव्हे, तर पुणे महापालिकेच्या आरोग्य आणि मालमत्ता विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेने सह्याद्री रुग्णालयाला नोटीस पाठवली असून, संबंधित आर्थिक व्यवहार आणि दस्तऐवजांची मागणी केली आहे. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला या नोटिसींना उत्तर देणे आवश्यक आहे.
( नक्की वाचा: सह्याद्री हॉस्पिटलची जागा ना विकता येणार ना भाड्याने देता येणार, 6400 कोटींचा व्यवहार अडचणीत )
प्रकरण नेमके काय आहे ?
पुण्यातील मोठी रुग्णालय साखळी असलेलं सह्याद्री हॉस्पिटल्सची विक्री हा सध्या राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील चर्चेचा विषय आहे. भारतातील आघाडीची रुग्णालय साखळी असलेल्या मणिपाल हॉस्पिटल्सने ही खरेदी केली आहे. हा संपूर्ण व्यवहार 6,400 कोटी रुपयांना झाल्याची माहिती आहे. पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटल हे पूर्वी कोकण मित्र मंडळातर्फे चालवले जात होते. कालांतराने या हॉस्पीटलचा मोठा हिस्सा ओटीपीपीकडे (Ontario Teachers' Pension Plan) घेतला होता. OTPP या कॅनडास्थित गुंतवणूकदार संस्थेने सह्याद्री हॉस्पिटल्समधील आपला प्रमुख हिस्सा मणिपाल समूहाला विकण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी 6400 कोटींचा व्यवहार करण्याचे निश्चित झाले होते. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोंढरे यांनी या व्यवहाराबद्दल शंका उपस्थित केल्या होत्या. कोंढरे यांनी म्हटले होते की, "पुणे महापालिकेने 1998 साली सह्याद्री हॉस्पिटल्सला 1 रुपया दराने 22 हजार स्क्वेअर फूट जागा 99 वर्षांच्या कराराने दिली होती. ही जागा सह्याद्री हॉस्पिटलला देत असताना ती धर्मादाय कारणांसाठी देण्यात येत असल्याचे म्हटले होते. डेक्कन परिसरातील ही जागा असून, धर्मादाय कारणांसाठी देण्यात आलेल्या या जागेचा विक्री व्यवहार कसा होऊ शकतो?"
( नक्की वाचा: मराठी माणसाने उभ्या केलेल्या 'सह्याद्री' हॉस्पिटल साखळीची विक्री, 6,400 कोटींना झाला सौदा )
जागा विकता येणार नाही!
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोंढरे यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते, त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन कार्यालयाने कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला एक पत्र पाठवले होते. या पत्रामध्ये म्हटले होते की या जागेसाठी पुणे महानगरपालिका आणि कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांच्यात 27 फेब्रुवारी 1998 रोजी एक भाडेकरार झाल्याची आठवण करून देण्यात आली होती. तसेच या भाडेकरारातील अटी दोन्ही पक्षांवर बंधनकारक असल्याचेही म्हटले होते. महापालिकेने याही गोष्टीची आठवण करून दिली होती की, या करारानुसार, भाडेपट्ट्याने दिलेली जागा किंवा तिचा कोणताही भाग तसेच या जागेवर बांधण्यात येणाऱ्या इमारतीचा कोणताही भाग इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला भाड्याने, पोटभाड्याने किंवा अन्य कोणत्याही प्रकारे देता येणार नाही. इतकेच नाही तर, हॉस्पिटलच्या इमारतीच्या बांधकामासाठी जमीन राष्ट्रीयीकृत बँक , सहकारी बँक किंवा अन्य कोणत्याही वित्त संस्थेकडे गहाण ठेवावयाची असेल, तर त्यासाठी महापालिका आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक आहे असेही म्हटले होते.