रेवती हिंगवे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयु्ष्यावर आधारित छावा (Chhaava Movie) हा सिनेमा सध्या देशभर तुफान गाजतोय. या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण, त्याचवेळी या चित्रपटाला वादाचं ग्रहण लागलं आहे. या चित्रपटातील प्रसंगावर शिर्के कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यात शिर्केंच्या वंशजांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना पुरावे दाखवण्याची नोटीस बजावली आहे. चित्रपट दाखवायच्या आधी यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. याबाबत आमचं मत विचारायला हवं होतं. पण, त्यांनी आमचा सल्ला घेतला नाही. दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावं अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा दीपक शिर्के यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर या विषयावर राज्यभर आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.
(नक्की वाचा- कुणी निवृत्त PSI तर कुणी फाड-फाड इंग्रजी बोलतंय; शिर्डीत 80 भिकाऱ्यांची धरपकड)
या चित्रपटात इतिहास जाणीवपूर्वक बदलला आहे. आमच्या घराण्याला बदनाम केलं जात आहे. षडयंत्र करत आमची बदनामी केली जातीय. आमच्या राजे शिर्के घराण्याला टार्गेट करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला.
( नक्की वाचा : '... तर माझं फडणवीस नाव बदला', शिवजयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्याचं चॅलेंज )
राजे शिर्के घराण्याचं खूप मोठं योगदान आहे.आम्ही गद्दारी केली असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यानंतरही हे आरोप कसे केले जात आहेत? इतिहास गायब केला जात आहे. आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही, मात्र खलनायक चुकीचा दाखवला आहे. समाजात तेढ निर्माण केली जात आहे. गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा ठावठिकाणा सांगितला नाही, असा दावा त्यांनी केला. छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवलाय, असा आरोप शिर्के यांनी या पत्रकार परिषदेत केला.