Chhatrapati Sambhajinagar: 'आजी, तुमची लॉटरी लागली!'; खोटं सांगून महिलेला लुटलं; चोरटे सीसीटीव्हीत कैद

छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल परिसरात "आजी, तुमची लॉटरी लागली आहे!" असे आमिष दाखवून एका 68 वर्षीय वृद्ध महिलेची 3 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्यांची फसवणूक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्सूल परिसरात भरदुपारी एका अज्ञात तरुणाने 68 वर्षीय वृद्ध महिलेला गोड बोलून आणि लॉटरीचे आमिष दाखवून विश्वासात घेतले अन् त्यांच्या हातातील सुमारे 3 तोळ्यांच्या चार सोन्याच्या बांगड्या काढून घेऊन पलायन केले.

नक्की कसा घडला प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, हर्सूल परिसरात वृद्ध महिला जात असताना एका अज्ञात तरुणाने त्यांना अडवले. "आजी, तुमची लॉटरी लागली आहे!" असे सांगत आरोपीने वृद्धेशी अत्यंत गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने वृद्धेला आपल्या दुचाकीवर बसवले आणि राजधानी हॉटेलजवळ घेऊन गेला. लॉटरीचे पैसे मिळवण्यासाठी सोन्याच्या बांगड्या दाखवाव्या लागतील, असा बहाणा आरोपीने केला. वृद्धेने विश्वासाने आपल्या हातातील तीन तोळ्यांच्या चार सोन्याच्या बांगड्या काढून आरोपीच्या हातात दिल्या.

Advertisement

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)

बँकच नसल्याचे लक्षात आल्यावर उडाला गोंधळ!

बांगड्या हातात आल्यानंतर भामट्याने वृद्धेला "तुम्ही समोरच्या बँकेत जाऊन पैसे आणि बांगड्या घेऊन या" असे सांगितले आणि तो क्षणात तेथून पसार झाला. वृद्ध महिला जेव्हा पुढे गेल्या, तेव्हा तेथे कोणतीही बँक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच वृद्धेने आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत आरोपी निघून गेला होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू

या प्रकरणी पीडित वृद्धेच्या तक्रारीवरून हर्सूल पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण फसवणुकीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये (CCTV) कैद झाली आहे. पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भामट्याचा माग काढत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सदाफुले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Topics mentioned in this article