Chhatrapati Sambhajinagar: पैशांपुढे नातं हरलं! मुलाने भररस्त्यात वडिलांना चाकूने वार करून संपवलं

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधील सिल्कमील कॉलनी परिसरात एका 82 वर्षीय वृद्ध वडिलांची त्यांच्याच सख्ख्या मुलाने भररस्त्यात चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar: घराचा ताबा मिळवण्यासाठी तब्बल 2 वर्षे कोर्टाची पायरी झिजवली, ज्या घरात शांततेत शेवटचे दिवस काढायचे स्वप्न पाहिले, त्याच घरात गृहप्रवेश करण्यापूर्वी एका वृद्ध वडिलांचा त्यांच्याच पोटच्या मुलाने बळी घेतला. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्कमील कॉलनी परिसरात भररस्त्यात एका 82 वर्षांच्या वृद्ध वडिलांची त्यांच्या सख्ख्या मुलाने चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जाफर कमरुद्दीन सय्यद पटेल (वय 82) असे मृत वडिलांचे नाव असून, पोलिसांनी नराधम मुलगा अब्दुल रहेमान अब्दुल जाफर याला ताब्यात घेतले आहे. या प्राणघातक हल्ल्यात मृताची मुलगी म्हणजेच आरोपीची बहीणही गंभीर जखमी झाली आहे.

भररस्त्यात रिक्षा अडवून रक्ताचा खेळ

मृत जाफर पटेल हे जलसंपदा विभागातून निवृत्त अधिकारी होते. गुरुवारीच कोर्टाने वादग्रस्त घराचा निकाल जाफर यांच्या बाजूने लावला होता. कोर्टाचा निकाल बाजूने लागल्यानंतर आनंदाने घराचा अधिकृत ताबा घेऊन जाफर पटेल हे आपल्या मुलीसोबत रिक्षाने परतत होते. मात्र, आरोपी मुलगा अब्दुल रहेमान याने सिल्कमील कॉलनी परिसरात त्यांची रिक्षा भररस्त्यात अडवली. पेशाने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेल्या या मुलाने रिक्षातच वडिलांवर आणि बहिणीवर चाकूने सपासप वार केले. जाफर पटेल यांचा जागीच मृत्यू झाला, तर बहीण रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.

Advertisement

(नक्की वाचा-  Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)

घटनेमागील वेदनादायी 'इंसाईड स्टोरी'

आरोपी मुलगा अब्दुल रहेमान हा अत्यंत हिंसक प्रवृत्तीचा होता. तो घरात आई-वडिलांशी सातत्याने वाद घालायचा आणि मारहाण करायचा. त्याच्या पहिल्या पत्नीनेही त्याच्या याच छळाला कंटाळून त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा  गुन्हा दाखल केला होता. मुलाच्या रोजच्या मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून अखेर वृद्ध वडिलांनी पुण्याला आपल्या मुलीकडे आश्रय घेतला होता.

वडिलांनी आपल्याच हक्काच्या घरासाठी मुलाविरोधात कायदेशीर लढाई सुरू केली. तब्बल 2 वर्षे हा कोर्ट कचेरीचा खटला चालला. गुरुवारी अखेर कोर्टाने वडिलांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, हाच आनंद या कुटुंबासाठी अखेरचा ठरला.

परिसरात खळबळ, आरोपी गजाआड

भरदिवसा आणि गजबजलेल्या रस्त्यावर झालेल्या या थरारामुळे सिल्कमील कॉलनी परिसरात कमालीची दहशत पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ धाव घेत जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी मुलगा अब्दुल रहेमान याला तात्काळ अटक केली असून, त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Topics mentioned in this article