ZP Election 2026: संभाजीनगरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा; भाजपच्या खेळीनेही धाकधूक वाढली

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज रणधुमाळी उडाली आहे. भाजपला रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता असतानाच, ठाकरे गटाचे दोन सदस्य फुटण्याच्या भीतीने 'व्हीप' जारी करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी आज सत्तेचा महासंग्राम पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या निवडणुकीत शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, भाजपनेही मोठी मोर्चेबांधणी केली आहे. दुपारी दोन वाजता होणाऱ्या विशेष सभेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात हायव्होल्टेज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राजकारणातील दोन टोकाचे शत्रू म्हणजेच शिंदे सेना आणि उद्धव सेना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हातमिळवणी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, दुसरीकडे घोडेबाजाराची भीती असल्याने सर्वच पक्षांनी आपल्या सदस्यांना 'कव्हर' केले आहे.

Advertisement

ठाकरे गटाचे 'व्हीप' अस्त्र

निवडणुकीच्या तोंडावर उद्धव सेनेचे दोन सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही फूट रोखण्यासाठी उद्धव सेनेने आपल्या सर्व सदस्यांसाठी 'व्हीप' (Whip) जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हीपचे उल्लंघन केल्यास सदस्यांचे पद धोक्यात येऊ शकते, त्यामुळे सदस्यांवर दबाव वाढला आहे.

(नक्की वाचा-  KDMC च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार? कल्याण-डोंबिवली पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?)

रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि खबरदारी

महायुतीमध्ये असूनही भाजप आणि शिंदे सेना एकमेकांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  दोन्ही पक्षांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सदस्यांना सहलीवर नेले आहे. सहलीवर गेलेले हे सदस्य थेट मतदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहेत. दुपारी दोन वाजता विशेष सभेला सुरुवात होईल, त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

सत्तेचे गणित आणि पेच

जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष असला, तरी दोन्ही शिवसेना गट एकत्र आल्यास आकड्यांचे गणित पूर्णपणे बदलू शकते. शिंदे गटातील स्थानिक नेत्यांची भाजपसोबत असलेली नाराजी ठाकरे गटाच्या पथ्यावर पडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

Topics mentioned in this article