शुभम बायस्कार, अमरावती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र आता डॉ. कमलताई गवई या संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्या आहेत. त्यांचे निकटवर्तीयही त्या नेमक्या कुठे गेल्या, याबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यांच्यासोबतच त्यांचे पुत्र आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांचाही मोबाईल बंद येत आहे, ज्यामुळे हे गूढ वाढले आहे.
डॉ. कमलताई गवई यांच्या नावे सोशल मीडियावर पत्र व्हायरल होत आहे. ते पत्र खोटे असल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर 5 ऑक्टोबर रोजी अमरावतीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात डॉ. कमलताई गवई यांचे स्वीय सचिव साहेबराव भालेराव यांनी एनडीटीव्ही मराठीला सविस्तर माहिती दिली आहे.
साहेबराव भालेराव यांनी म्हटलं की, स्थानिक कार्यक्रम असल्याने डॉ. कमलताई या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या. त्यांचा त्या ठिकाणी सत्कार देखील करण्यात येणार होता. परंतु, संघाच्या कार्यक्रमात आंबेडकरी विचारधारा असलेल्या गवई कुटुंबातील कमलताई उपस्थित राहणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सामाजिक दबाव प्रचंड वाढला.
सामाजिक स्थिती आणि लोकांच्या भावना लक्षात घेता, डॉ. कमलताई गवई यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असा सल्ला त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना दिला. त्यानुसार, गवई या कार्यक्रमाला जाणार नाहीत, हे निश्चित झाले आहे, अशी माहिती साहेबराव भालेराव यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना दिली.
(नक्की वाचा- CIDCO News: 'सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करा', CM समोर लॉटरी विजेत्यांनी काय केले, फडणवीसांचे आश्वासन काय?)
या संपूर्ण प्रकरणामुळे आता डॉ. कमलताई गवई 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार हे निश्चित आहे. मात्र त्या संपर्क क्षेत्राबाहेर असणे हे यामुळे अनेक चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.