गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. शेकडो वर्षांची परंपरा असलेले चोर गणपती आज सांगलीच्या गणपती मंदिरात विराजमान झाले. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला प्रतिष्ठापना होणाऱ्या सांगलीतील चोर गणपतीला साधारण 200 वर्षांची परंपरा आहे. (Ganesh Chaturthi 2024 )
गणपती बाप्पा हे सांगलीचं आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे ते श्रद्धास्थान आहे. चोर गणपती (Chor Ganpati) बसवण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस अगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिध्द गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो.
गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. सांगलीत मात्र चार दिवस अगोदर गणेशाचे आगमन होते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात गणपती बसवला जातो. गणपती बाप्पा आल्याची कोणालाही माहिती नसते. म्हणून या प्रथेला चोर गणपती म्हणतात. सांगलीमध्ये गेल्या दोनशे वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. दोनशे वर्षांपूर्वी कागदी लगदयापासून गणेशाची मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी त्याच दोन मूर्तींची स्थापना केली जाते. गणपती मंदिरातील गणरायाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्हीही मूर्ती बसविण्यात येतात. विशेष म्हणजे या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. त्याचे जतन केले जाते. या मूर्तीला सुरक्षितस्थळी ठेवले जाते.
नक्की वाचा - सणासुदीच्या काळात गोड पदार्थांवर मनसोक्त ताव मारायचाय? फॉलो करा या टिप्स
कशी होते गणपतीची स्थापना..
सांगतील पटवर्धन संस्थानच्या श्री गणपती पंचायतन मंदिरातील मुख्य गर्भगृहाबाहेर दोन्ही बाजूला कागदी लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तींची स्थापना केली जाते. भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच ऋषीपंचमीला याचं विसर्जन होतं. गणपती बाप्पा कधी येतो आणि कधी जातो कळतही नाही. त्यामुळेच याला चोर गणपती म्हणतात.