सिडकोची नवी मुंबई, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर स्थानका बाहेर मोक्या ठिकाणी घरे बांधली जात आहे. सर्व सामान्यांना परवडणारी ही घरे आहेत. या घरांच्या लॉटरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अनेक अफवाही पसरवल्या जात आहे. या घरांच्या लॉटरीबाबत काही दिवसां पूर्वी एक पत्र व्हायरल झाले होते. या पत्रात नवी मुंबई, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर स्थानका बाहेर असलेल्या घरांची लॉटरी 15 ऑगस्टला जाहीर होणार आहे असे सांगण्यात आले होते. शिवाय ही घरे जो पहिला येईल त्याला घर या अंतर्गत देण्यात येतील असेही सांगण्यात आले होते. हे पत्र जोरदार व्हायरल झाले होते. त्यामुळे ज्यांना ही घरे हवी आहेत त्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अर्ज कुठे करायचा? कधी करायचा? पात्र कोण? अपात्र कोण? याची चर्चा आणि शोधाशोध सुरू झाली होती. त्यानंतर सिडकोने आता याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे लॉटरी होणार आहे की नाही हे आता स्पष्ट झाले आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिडको महामंडळामार्फत नवी मुंबईतील विविध ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिका बांधण्यात येत आहेत. या सदनिकांच्या विक्रीसाठीची गृहनिर्माण योजना अद्याप सिडकोमार्फत सादर करण्यात आलेली नाही असे सिडकोने स्पष्ट केले आहे. परंतु काही सामाजिक माध्यमांद्वारे सिडको महागृहनिर्माण योजने संदर्भात जनतेमध्ये चुकीची माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास येत आहे असे सिडकोने म्हटले आहे.
सिडको महामंडळाने या सदनिकांच्या विक्रीसाठी कोणत्याही सेवा केंद्र अथवा एजन्सीची नेमणूक केलेली नाही. याबाबत खासगी व्यक्ती किंवा संस्था यांच्यामार्फत पसरविण्यात येणाऱ्या खोट्या व चुकीच्या जाहीराती,योजना आणि बातम्यांना बळी पडू नये, असे सिडकोतर्फे जनतेस आवाहन करण्यात आले आहे. अशा अफवांना बळी पडून फसवणूक झाल्यास त्यास सिडको जबाबदार राहणार नाही, असेही सिडकोने सांगितले आहे.
ट्रेंडिंग बातमी - ठाकरेंची मराठा आरक्षणावर रोख 'ठोक' भूमिका, कोणाची पंचाईत होणार?
दरम्यान अशा प्रकारच्या खोट्या बातम्या, माहिती निदर्शनास आल्यास जनतेनी सिडकोच्या दक्षता विभाग, सिडको भवन यांच्याकडे लेखी तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सिडकोमार्फत जाहीर करण्यात येणाऱ्या योजनेबाबत अधिकची माहिती हवी असल्यास, योजनेत अर्ज दाखल करण्यात अडचणी येत असतील तर त्याचे निराकरण करण्यासाठी लोकांनी बेलापूर इथल्या निवारा केंद्राला भेट द्यावी असेही सांगण्यात आले आहे.