यशश्री हत्याकांडाचा (Yashshree Shinde murder case) मुख्य आरोपी दाऊद शेख (Dawood Shaikh) याला अखेर नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यशश्री शिंदेच्या मृत्यूच्या पाचव्या दिवशी दाऊद पोलिसांच्या हाती लागला आहे. आज सकाळी त्याला कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील शहापूर येथील अलदर गावातून ताब्यात घेण्यात आलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात होता. दाऊद हा कर्नाटकचा असल्याने पोलीस त्याचे कुटुंबीय, मित्र यांच्या संपर्कात होते. त्याच्याच मित्रांनी दिलेल्या ठिकाणावरून पोलिसांनी दाऊदच्या मुसक्या आवळल्या.
दाऊदचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ ते नऊ पथकं काम करीत होती. त्यांनी दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेतलं होतं. यांच्या चौकशीअंती दाऊदचं मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं. या प्रकरणात अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केला. सध्या दाऊदची चौकशी सुरू असून लवकरच या प्रकरणातील सर्व माहिती समोर येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नक्की वाचा - साध्या वेशात पोलिसांनी नराधम दाऊदच्या आवळल्या मुसक्या; यशश्री हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट
यशश्रीची हत्या केल्याची कबुली दाऊदने पोलिसांकडे दिली आहे. गेल्या अनेक काळापासून दाऊद आणि यशश्री दोघेही संपर्कात होते. 25 जुलै रोजी दोघेही ठरवून भेटायला गेले होते. या भेटीदरम्यान दोघांमध्ये वाद झाला असावा आणि त्यातून दाऊदने यशश्रीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यशश्रीचा चेहरा दगडाने ठेचला होता का?
दीपक साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्रीच्या मत्यूनंतर तिचा चेहरा विद्रुप झाल्याची शक्यता आहे. तेथील आजूबाजूची जनावरं, कुत्रा यांनी यशश्रीच्या चेहऱ्यावरील मांस खाल्ल्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world