मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास हा विधानसभा निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा बनलाय. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रश्नावर टीका केली होती. राहुल गांधी यांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
राहुल गांधी मुंबईत मोठी तिजोरी घेऊन आले आहेत. आम्हाला वाटलं की ते महाराष्ट्राला काही देण्यासाठी आले आहेत. पण, ते महाराष्ट्राची तिजोरी लुटण्यासाठी आले आहेत. राज्यात डाका घालणारी अन्य मंडळी होती. त्यामध्ये आणखी एकाची भर पडली आहे. आम्हाला राहुल गांधींकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांना धारावीबाबत चुकीची माहिती देण्यात आली आहे.
धारावीमध्ये 2 लाख जणांना घरं मिळणार आहेत. 2 लाख लोकांचं आयुष्य बदलणार आहे. ते कचऱ्यात, घाणीत राहातात. त्य़ांचं आयुष्य अतिशय हालाखीत आहे. तिथं दलित, आदिवासी, मागसवर्गीय सर्वांचा समावेश आहे. त्यांना न्याय द्यायचा असेल तर राहुल गांधींनी संपूर्ण माहिती घ्यावी. यापूर्वी काय झालं होतं, ते समजून घ्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. सरकारमधून पायउतार झाल्यानंतरच विरोध का करता? असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला.
( नक्की वाचा : 'मोठ्या घरात राहणाऱ्यांना गरिबांच्या वेदना काय कळणार?' धारावी प्रोजेक्टवर CM शिंदेंचं उत्तर )
सर्वांनी धारावीला प्राधान्य द्यायला हवा. हा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्याला विशेष दर्जा देण्यात आला आहे. मी धारावीकरांना अवाहन करतो की त्यांनी राजकीय लोकांपासून दूर ठेवा आणि स्वत:चा फायदा काय आहे, ते पाहा. आम्हाला यापासून काहीही देणंघेणं नाही. धारावीकरांना पक्क घरं मिळावं. 2 लाख जणांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं असं 2 लाख कोटींचं घरं द्यायचे आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.