राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Ratnagiri CNG News : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या सीएनजी (CNG)गॅसच्या तुटवड्यामुळे आणि वाढत्या मागणीमुळे वाहनचालकांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.जिल्ह्यातील चिपळूण,रत्नागिरी शहर,राजापूर आणि खेड-लोटे यांसारख्या महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये सीएनजी पंपावर वाहनांच्या अर्धा-अर्धा किलोमीटर लांब रांगा लागल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.यामुळे केवळ पर्यटकच नव्हे,तर स्थानिक रिक्षा व्यावसायिकही आर्थिक संकटात सापडले आहेत.
पर्यटक आणि चाकरमान्यांच्या गर्दीचा परिणाम
सध्या सुट्ट्यांचा काळ आणि विविध कारणांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे.त्याचबरोबर मुंबई-पुण्याहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची संख्याही लक्षणीय आहे.अनेक पर्यटकांनी आणि चाकरमान्यांनी सीएनजी वाहनांना पसंती दिल्याने पंपांवरील ताण प्रचंड वाढला आहे.रत्नागिरी शहरातील अनेक पंपांवर वाहनांच्या रांगा मुख्य रस्त्यापर्यंत आल्या असून वाहनचालकांना आपला नंबर येण्यासाठी 1 ते 2 तास ताटकळत उभे राहावे लागत आहे.जिल्ह्यातील महत्त्वाच्या केंद्रांवर सीएनजीची हीच स्थिती आहे. चिपळूण,रत्नागिरी,राजापूर,खेड लोटे परिसरात सीएनजी गॅस पंपांवर हीच स्थिती आहे.
नक्की वाचा >> Beed News: मामा-मामी रात्री शेतात गेले, भाचाची नियत फिरली, मामाच्या मुलीसोबत घरात केला संतापजनक प्रक्रार
रिक्षा व्यावसायिक आर्थिक संकटात
सीएनजीच्या या रांगांचा सर्वाधिक फटका स्थानिक रिक्षा चालकांना बसला आहे.रत्नागिरीतील बहुतांश रिक्षा आता सीएनजीवर धावतात.मात्र,इंधन भरण्यासाठी दिवसातील 2 ते 3 तास रांगेतच जात असल्याने त्यांच्या दैनंदिन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. "गॅससाठी रांगेत उभे राहिल्यामुळे दिवसाच्या महत्त्वाच्या फेऱ्या चुकतात.वेळ वाया जात असल्याने दिवसाचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे.कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा,हा प्रश्न आता आमच्यासमोर उभा आहे," अशी व्यथा एका रिक्षा चालकाने मांडली.
प्रशासनाकडून ठोस कारवाईची मागणी
जिल्ह्यात सीएनजी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.मात्र त्या तुलनेत गॅस पंपांची संख्या अत्यंत मर्यादित आहे.अनेकदा गॅसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने पंप बंद ठेवावे लागतात.ज्यामुळे रांगा अधिकच लांबतात. या पार्श्वभूमीवर,रत्नागिरी जिल्ह्यात तातडीने सीएनजी पंपांची संख्या वाढवावी आणि गॅसचा पुरवठा सुरळीत करावा,अशी मागणी वाहनचालक आणि संघटनांकडून केली जात आहे.प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात वाहनचालक आणि विशेषतः रिक्षा व्यावसायिक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.