पालघरमधील दातीवारे समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी एक थरारक प्रकार घडला. भारतीय तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर अचानक समुद्रकिनाऱ्यावरील खडकावर उतरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. समुद्रातील एका खडकावर दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसल्याने मुंबई कोस्टगार्डने तातडीने हे पाऊल उचलले. मात्र चौकशीअंती वेगळेच वास्तव समोर आले.
नेमकं काय घडलं?
मुंबई आणि दमण तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर नियमित गस्तीवर (Patrolling) असताना दातीवारे किनाऱ्याजवळील समुद्रातील खडकावर दोन व्यक्ती उभ्या असल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. रक्षेच्या कारणास्तव या व्यक्तींकडे चौकशी करणे आवश्यक वाटल्याने मुंबई कोस्टगार्डचे चेतक हेलिकॉप्टर थेट खडकावर उतरवण्यात आले. अचानक हेलिकॉप्टर खाली उतरताना पाहून किनाऱ्यावरील नागरिकांची धावपळ उडाली. काही काळ संशयास्पद व्यक्ती किंवा दहशतवादी घुसखोरीची अफवा पसरल्याने भीतीचे वातावरण होते.
(नक्की वाचा- Iran War Crises: सिलेंडरच्या किंमती 3000 रुपयांवर! मुंबईतील हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर)
चौकशीनंतर सत्य आलं समोर
हेलिकॉप्टरमधील जवानांनी तातडीने त्या दोन व्यक्तींची चौकशी केली. मात्र, तपासात असे समोर आले की, ते दोन्ही व्यक्ती स्थानिक मच्छीमार होते आणि मासेमारीसाठी समुद्रातील त्या खडकावर उतरले होते. कोणतीही संशयास्पद बाब आढळली नसल्याची खात्री पटल्यानंतर आणि मच्छीमारांची ओळख पटल्यानंतर कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
(नक्की वाचा- T20 World Cup 2026 Final: अंतिम सामन्यात धोनी-रोहित उपस्थित, विराट कोहली का दिसला नाही?)
पोलीस अधीक्षकांचे स्पष्टीकरण
पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, "मुंबई कोस्टगार्डचे चेतक हेलिकॉप्टर केवळ मच्छीमारांची चौकशी करण्यासाठी किनाऱ्यावर उतरले होते. सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेली ही एक नियमित खबरदारी होती."
विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात तांत्रिक बिघाडामुळे केळवे रोड परिसरातील एका शाळेच्या आवारात हेलिकॉप्टर उतरवावे लागले होते. त्या घटनेची आठवण या निमित्ताने नागरिकांना झाली.