शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या दबावतंत्रानंतर काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी जागावाटप करताना मित्र पक्ष नको तितका दबाव वाढवत असेल तर लोकसभेतील सांगली पॅटर्नचा इतिहास सांगा. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची राज्यातील नेत्यांना सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जागावाटप करताना जिथे काँग्रेसची ताकद आहे, त्या विधानसभा मतदारसंघांवर देखील दावा करत आहे. यामुळे जागावाटपात अनेक ठिकाणी वाद निर्माण होत आहेत, याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठांना नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
(नक्की वाचा- अजित पवार गटातील बड्या नेत्याच्या मतदारसंघावर भाजपचा दावा; 'नोटा'ला मतदान करण्याचा इशारा)
जागावाटपाची चर्चा करत असताना अनेक जागा अशा आहे तिथ काँग्रेसची ताकद जास्त आहे. तरी देखील दबाव म्हणून मित्र पक्षाकडून भूमिका घेतली जात असेल तर दबावखाली फार न येता लोकसभा निवडणुकीत सांगली पॅटर्न आठवण करून द्या असा सल्ला काँग्रेसच्या वरिष्ठांनी दिल्याची महिती आहे.
सांगली पॅटर्नची स्थिती कुठे निर्माण होऊ शकते?
पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, विदर्भात ठाकरे गट काही जागांवर दावा करत आहे. जिथे मुस्लीम, दलित मतदार अधिक आहे, तसेच आघाडीत पारंपरिक पद्धतीने काँग्रेस विधानसभा जागा लढवत आहे तिथे देखील ठाकरे गटाकडून काही जागांवर दावा केला जात आहे.
(नक्की वाचा- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना; राज्यातील पहिली ट्रेन कोल्हापूरातून आयोध्येसाठी जाणार)
काय आहे सांगली पॅटर्न?
लोकसभा जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला होता. मात्र आमचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचं काँग्रेसकडून वारंवार सांगितलं जात होतं. तरीदेखील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत अणि उद्धव ठाकरे यांनी आडमुठी भूमिका घेत सांगलीची जागा महाविकास आघाडीकडून आपल्या पदरात पाडून घेतली. काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि त्याठिकाणी जिंकून आले. ताकद कमी असताना देखील हट्ट करून ठाकरे गटाने ही जागा मिळवली. मात्र तिथे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.